व्यवस्थाकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे स्वागत; पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
मुबई दि.11: नक्षल प्रभाव असलेल्या गोंदिया जिल्ह्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समूहाने बुधवारी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रगरीत सुरु असलेल्या चित्रीकरणाचा प्रत्यक्ष आनंद घेतला. प्रत्यक्ष चित्रीकरणासह, मालिकांचे सेट,आणि कलाकारांना भेटून हे सर्व विद्यार्थी भारावून गेले. दरम्यान महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्य शासनामार्फत नक्षल प्रभावित जिल्ह्यामधील किशोरवयीन मुला-मुलींच्या उन्नतीसाठी “आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजना” राबवली जाते. या योजनेतर्गत गोंदिया जिल्ह्यातील १४ ते १८ वयोगटातील मुला-मुलीच्या उज्वल भविष्यासाठी व त्यांच्या मनातील नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी होण्यासाठी, त्यांना महाराष्ट्र राज्याची औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, व शैक्षणिक प्रगतीची माहिती व्हावी, या दृष्टीने गोंदिया पोलीस विभागामार्फत मुंबई दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या सहलीनिमित्ताने आलेल्या विद्यार्थ्यांना चित्रनगरीतील तारक मेहता का उलटा चष्मा आणि द कपिल शर्मा शो चा सेट दाखविण्यात आला. त्याचबरोबर सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेचे प्रत्यक्ष चित्रीकरण आणि मालिकेतील कलाकारांना भेटण्याची, त्यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळाली. त्यामुळे सर्वच विद्यार्थी भारावून गेले होते.