युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करावे – राज्यपाल भगत सिंग कोश्यारी

मुंबई, दि. १२ : युवाशक्तीसाठी स्वामी विवेकानंदांचे जीवन आणि विचार मार्गदर्शक ठरणारे आहेत. विवेकानंद जीवनचरित्र मराठी, हिंदी, बंगाली अशा विविध भाषेत उपलब्ध आहे, युवकांनी हे चरित्र आत्मसात करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी केले.

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विवेकानंद युथ कनेक्ट संस्थेच्यावतीने मुंबई शाश्वत शिखर परिषदेचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार ॲड. आशीष शेलार, विवेकानंद युथ कनेक्ट संस्थेचे डॉ. राजेश सर्वज्ञ, गोपाल आचार्य, नानक रूपानी आदी उपस्थित होते. विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना यावेळी स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशात सर्वत्र युवा दिन साजरा होत आहे. तर, मॉ जिजाऊ यांची जयंती साजरी होत आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये पहिल्या भाषणात ‘मेरे भाई और बहिनो’ या वाक्यांनी सुरुवात करून विश्वबंधुत्वाची भावना जगाला दाखवून दिली. आपल्या विद्वत्तेतून जगाला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. विश्वकल्याण आणि प्रखर राष्ट्रभक्ती यांबाबत त्यांनी परखडपणे मांडणी केली. युवकांना जागृत करण्याचे काम त्यांनी केले.

बदलत्या वातावरणामुळे वातावरणीय बदल, पर्यावरण, विकास याबाबत देशात सर्वांगीण विचार होत आहे. प्रगती, विकास आणि पर्यावरण यांच्यात संतुलन राहावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विवेकानंद युथ कनेक्ट संस्थेचे कार्य युवकांना एकत्र करून त्यांना वर्तमान आणि भविष्यात एकत्र ठेवणे अशा प्रकारचे आहे.

शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, जगाला विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखवण्याचे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले. त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न आम्ही करू असे सांगून ते पुढे म्हणाले की, मुंबईत आज बऱ्याच पायाभूत सुविधा होत आहेत मेट्रो, कोस्टल रोड व पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक कामे चालू आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सौर उर्जेचे विविध स्रोत तयार करणे, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे, वाहतूक सिग्नलमध्ये सुसुत्रता आणणे, असे काम चालू आहे. देशाच्या जीडीपीमध्ये मुंबईचा ३० टक्के वाटा आहे. मुंबईच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्री श्री. केसरकर यांनी केले.

000000

प्रवीण भुरके/ससं