आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो चषक २०२३ च्या विजेत्या संघास उपराष्ट्रपतींच्या हस्ते चषक प्रदान

मुंबई, १४: आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो चषक २०२३ च्या विजेत्या डायनॅमिक संघाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

महालक्ष्मी येथील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब मैदान येथे आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो कपचा अंतिम सामना आयोजित करण्यात आला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, श्रीमती सुदेश धनखड, श्रीमती राजश्री बिर्ला, कुमार मंगलम बिर्ला आदी उपस्थित होते. या सामन्याचा प्रारंभ उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी चेंडू फेकून केला.

अंतिम सामना मॅडॉन पोलो आणि डायनॅमिक्स अचिव्हर्स संघामध्ये रंगला. यामध्ये डायनॅमिक्स अचिव्हर्स संघ विजेता ठरला. यावेळी प्रत्येक खेळाडूचा चषक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी आदित्य बिर्ला यांच्या कार्याचा गौरव केला, तसेच त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजळा दिला. या सामन्यावेळी बिर्ला समूहाचे आणि इंडियन पोलो असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.