मुंबई, दि. 15 : नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देऊन देशातील उद्योजकतेला चालना देणे व परिणामी देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. केंद्र शासनाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) यांच्यामार्फत मान्यताप्राप्त असलेल्या देशातील एकूण 88 हजार 136 स्टार्टअपपैकी सर्वाधिक 16 हजार 250 स्टार्टअप (18 टक्के) महाराष्ट्रातील आहेत. त्याचप्रमाणे आज देशातील 108 युनिकॉर्नपैकी 25 युनिकॉर्न्स (23 टक्के) महाराष्ट्रातील आहेत. युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन 1 बिलियन अमेरिकन डॉलर्स (100 करोड़ डॉलर ) म्हणजेच 8 हजार कोटी रुपयापेक्षा जास्त आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 5 ते 7 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 मान्यताप्राप्त तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. मुंबईमधे सुमारे 5 हजार 900, पुण्यामध्ये 4 हजार 535, औरंगाबादमध्ये 342, सिंधुदुर्गमध्ये 19 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत.
स्टार्टअपना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
राष्ट्रीय स्टार्टअप दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी कौशल्य विकासाची सुरुवात केली. राज्यामध्येही त्यानंतर स्वतंत्र कौशल्य विकास विभाग सुरु करण्यात आला. स्टार्टअप आणि युनिकॉर्न्सना चालना देण्यासाठी राज्यात विविध सवलती, योजना यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात स्टार्टअपच्या विकासासाठी इकोसिस्टम तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल ठरत आहे. राज्यातील अगदी दुर्गम भागातील युवक-युवतींकडूनही स्टार्टअप विकसीत केले जात आहेत. नुकत्यात राबविण्यात आलेल्या स्टार्टअप यात्रेला राज्यातील सर्वच भागातून चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांच्याकडील नवनवीन संकल्पनांचा शासनाच्या विविध विभागांच्या कामकाजामध्ये वापर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
स्टार्टअपना प्रोत्साहनासाठी राष्ट्रीय दिवस
नवउद्योजक आणि स्टार्टअपने नाविन्यतेचा घेतलेला ध्यास, त्यातून निर्माण होणाऱ्या नवीन रोजगाराच्या संधी व यामुळे देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्याच्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी 16 जानेवारी रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
भारत सरकारने 16 जानेवारी 2016 रोजी स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू केला. नवउद्योजक, स्टार्टअपला प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मिती व एक मजबूत परिसंस्था तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमासाठी भारत सरकारचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) हा नोडल विभाग आहे. सद्यस्थितीत भारतात सुमारे 2 लाख 44 हजार स्टार्टअपची नोंद झालेली आहे व यातील 88 हजार 136 स्टार्टअप उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागातर्फे (DPIIT) मान्यताप्राप्त आहेत.
स्टार्टअपसाठी राज्यात विविध धोरणे, योजना
स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात अनेक धोरणे, योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य देशातील सर्वाधिक औद्योगिकता असलेले राज्य आहे आणि औद्योगिकतेला नाविन्यतेची साथ देऊन, महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018’ जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे. या धोरणातील मुख्य उद्दिष्टांतर्गत महाराष्ट्रामध्ये अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्मिती करून नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, स्टार्टअपना सक्षम करणे, नियामक रचना सुलभ करणे व पायाभूत सुविधांना चालना देऊन स्टार्टअप परिसंस्थेला विकसित करणे इ. चा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. या धोरणांतर्गत स्टार्टअप सप्ताह, इनक्यूबेटर्सची स्थापना, स्टार्टअप यात्रा, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणन अर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर व सीड फंड यांसारख्या अनेक उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी सन 2018 पासून कार्यरत आहे.
स्टार्टअप दिनानिमित्त सोमवारी विविध कार्यक्रम
राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे औचित्य साधून सोमवारी 16 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीद्वारे राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा करण्यात येणार आहे. या निमिताने नवउद्योजकांसाठी विशेष योजना, दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शक सत्र व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी अमित कोठावदे (सहाय्यक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी 9420608942 यांच्याशी संपर्क साधता येईल. तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईट आणि सोशल माध्यमांवर संपर्क साधता येईल.