जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील 40 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करावे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त श्री. गमे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूकीशी संबंधित नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिका आयुक्त देविदास पवार, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, रविंद्र भारदे, प्रसाद मते, किरण सावंत पाटील, राजेंद्र वाघ आदि उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. गमे म्हणाले, या निवडणुकीच्या कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल, अशी दक्षता घ्यावी. मतदान केंद्रांवर मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करावा. त्यासाठी कृती आराखडा तयार करावा. मतदान केंद्रांवरील दळण- वळण सुविधांचा आढावा घ्यावा. मतदान झाल्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया समजून घ्यावी. त्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करावा. मतदान व मतमोजणीसाठी सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करावेत. त्यांचेही प्रशिक्षण घ्यावे. मतपेटया तपासून घ्याव्यात. मतदान साहित्य ताब्यात देताना आवश्यक ती काळजी घ्यावी. सर्व नोडल अधिकारी यांनी त्यांचेवर सोपविलेली जबाबदारीचे तंतोतंत पालन करावे, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर आवश्यक ती दक्षता घ्येण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री.मित्तल यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता पालनाच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती बैठकीत दिली. पोलीस अधीक्षक यांनी निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले, तर उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. हुलवळे यांनी सांगितले, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. तेथे मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्गही पार पडला आहे. मतदान साहित्य वाटप व मतपेट्या वाहतुकीचे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
00000