गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणी पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

चंद्रपूर, दि. २१ : गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगांव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील १२ विद्यार्थ्यांना जेवणातून झालेल्या विषबाधा प्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना दिल्या आहेत. चेक बोरगांव येथील जिल्हा परिषद शाळेचे ५२ विद्यार्थी खराळपेठ येथे सहलीला गेले होते. जेवण करून सायंकाळी घरी आल्यानंतर १२ मुलांना मळमळ आणि उलट्या झाल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी येथे भरती करण्यात आले. भरती असलेल्या सर्वांची तब्येत बरी आहे. अन्य मुले आपापल्या घरी व्यवस्थित असली तरी त्यांची देखील वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याचे तहसीलदार यांनी कळविले आहे.

000