मुंबई, दि. २३ : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई (आय.आय.टी. मुंबई) यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत संयुक्त प्रकल्प राबविण्याच्या दृष्टिकोनातून सामंजस्य करार करण्यात आला.
या करारावेळी महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी (भा.प्र.से.), महाप्रितचे मुख्य महाव्यवस्थापक शरणप्पा कोल्लूर, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
आय.आय.टी. बॉम्बेचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद अत्रे, नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स इन कार्बन कॅप्चरचे समन्वयक डॉ. विक्रम विशाल, सहप्राध्यापक डॉ. अर्णब दत्ता, महाप्रितचे संचालक (संचलन) वि. ना. काळम पाटील, कार्यकारी संचालक (संचलन) सुनील पोटे, कार्यकारी संचालक (प्रशासन) प्रशांत गेडाम, मुख्य महाव्यवस्थापक उमाकांत धामणकर उपस्थित होते.
या सामंजस्य कराराव्दारे भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई येथील विकसित करण्यात आलेल्या कार्बन कॅप्चर व किफायतशीर ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प संयुक्तपणे राबविण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत जागतिक तापमानवाढीच्या समस्येवर या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण होऊन व नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.
००००
संध्या गरवारे/विसंअ