लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करणे प्रत्येकाचे कर्तव्य – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे

अमरावती, दि. २५ : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. या कर्तव्यपूर्तीसाठी मतदार यादीत नांव नसलेल्या १८ वर्षांवरील प्रत्येकाने मतदार नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे यांनी बुधवारी केले.

राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू विजयकुमार चौबे, प्र. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, धनुर्विद्यापटू मधुरा धामणकर आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी यावेळी मतदारदिनाची प्रतिज्ञा घेतली.

निवडणुकीच्या दृष्टीने मतदार नोंदणी महत्त्वाची असते. त्यामुळे वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाने मतदार यादीत आपले नांव असण्याची दक्षता घ्यावी व आपला मताधिकार बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्‌टे यांनी केले.

मतदार म्हणून कर्तव्य बजावण्याच्या शपथेचा उल्लेख करत कुलगुरू डॉ. चौबे म्हणाले की, मतदार प्रतिज्ञेचे पावित्र्य जाणून ती सर्वांनी ती आचरणात आणावी व मतदार म्हणून आपले कर्तव्य पूर्ण करावे.

मतदार नोंदणीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी, स्वयंसेवक आदींचा यावेळी गौरव करण्यात आला. डॉ. व्यवहारे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक राजेश बुरंगे यांनी सूत्रसंचालन केले. अमर कथोरे यांनी स्वागतगीत म्हटले. तहसीलदार संतोष काकडे यांनी आभार मानले. उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार मदन जाधव, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख, क्रीडा प्रशिक्षक पवन तांबट आदी यावेळी उपस्थित होते.

०००