मुंबई दि. 25: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मंत्रालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनात तब्बल 6 लाख रुपयांच्या ग्रंथाची विक्री करण्यात आली. यासोबत प्रदर्शनादरम्यान मंत्रालयीन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयोजित मराठी अभिवाचन स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली असून या स्पर्धेत शिल्पा नातू यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव आणि मराठी भाषा अभ्यासक प्रशांत साजणीकर यांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. अभिवाचन स्पर्धेत दुसरा क्रमांक श्वेता सूर्यवंशी, तृतीय पुरस्कार चित्रा चाचवड, उत्तेजनार्थ पुरस्कार पूजा भोसले, संगिता बेडेकर यांना प्राप्त झाला आहे. या स्पर्धेत सुमारे 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मंत्रालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद मिळाला. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात 6 लाख 14 हजार 505 रुपये किंमतीच्या पुस्तकांची विक्री झाली आहे. या प्रदर्शनात आत्मचरित्रात्मक, ऐतिहासिक, सकारात्मकता, स्पर्धा परीक्षा यासारख्या विषयांच्या पुस्तकांना तसेच दुर्मिळ, ग्रंथांना मागणी होती.
मंत्रालयाच्या प्रांगणात दिपाली केळकर यांच्या “हास्यसंजीवनी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील विनोदाच्या हास्य तुषारांनी मंत्रालयातील वातावरण हर्षोल्हासित झाले होते.
राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इ. संस्थांमधून मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि. 14 जानेवारी ते दि.28 जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो.
मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने मंत्रालयात आयोजित कार्यक्रमांची आज सांगता झाली.
००००
विसअ/अर्चना शंभरकर/मराठी भाषा