हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून लोकशाही अधिक बळकट करूया – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे

0
14

अमरावती, दि. २६ : जगातील सर्वात मोठी व यशस्वी लोकशाही म्हणून भारताचा जगभर गौरव होतो. ही संविधानाची ताकद आहे आणि येथील नागरिकांच्या सौहार्द, सहिष्णूता व बंधुभावाचे ते गमक आहे. नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाळून ही लोकशाही अधिकाधिक बळकट करण्याचा संकल्प आपण सर्वांनी प्रजासत्ताकदिनानिमित्त करूया, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे यांनी आज येथे केले.

 

भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण विभागीय आयुक्तांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात ते बोलत होते. विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, प्र. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक राकेश कलासागर आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रध्वज वंदन व राष्ट्रगीतानंतर विभागीय आयुक्तांनी मैदानावर जीपमधून फेरी मारून पोलीस, विविध सुरक्षा दलांच्या व विभागांच्या पथकांचे निरीक्षण केले. त्यांच्या हस्ते विविध गुणवंत अधिकारी व कर्मचा-यांना गौरविण्यात आले.

विभागीय आयुक्तांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की,  देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात लोकांचे राज्य स्थापण्याच्या हेतूने लोकशाही प्रस्थापित करण्याचा विचार पुढे आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने राज्यघटना निर्माण केली. ती २६ जानेवारी १९५० रोजी देशभर लागू करण्यात आली. आज सात दशकांहून अधिक काळ लोकशाही या देशात दृढपणे टिकून आहे, वृद्धिंगत व अधिक मजबूत होत आहे. ही खरी संविधानाची ताकद आहे.

ते पुढे म्हणाले की, लोकशाही हा केवळ शासनसंस्थेचा प्रकार नाही तर ती एकत्रित असण्याची जीवनपद्धती आहे. समाज बदलण्याचे सामर्थ्य लोकशाहीच्या संकल्पनेत आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाला घटनात्मक हक्क संविधानाने बहाल केले आहेत. गत सात दशकांमध्ये राज्यघटनेद्वारे न्याय, समता, बंधुता, एकता व एकात्मता ही मूल्ये येथे रुजली. लोकशाही प्रस्थापित झाली.  लोकशाहीचे सक्षमीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. लोकसहभाग हा यातील महत्त्वाचा घटक आहे. हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून लोकशाही बळकट करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

राष्ट्रीय मतदार दिनाचा उल्लेख करून ते म्हणाले की, आपला मताधिकार बजावण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदार म्हणून नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘गाव हा विश्वाचा नकाशा’ या रचनेतील ओळीही त्यांनी यावेळी उद्धृत केल्या.

शासन व्यवहारात लोकसहभाग आवश्यक असतो. त्यामुळे एक मतदार म्हणून आणि एक नागरिक म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तव्य कसोशीने पार पाडण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर, विविध अधिकारी व कर्मचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण

दरम्यान मुख्य सोहळ्यापूर्वी भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. पांढरपट्‌टे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी राष्ट्रगीत व ध्वजवंदन झाले. त्यानंतर पोलीस पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहणानंतर विभागीय आयुक्तांनी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, विजय भाकरे, अजय लहाने, सहायक आयुक्त श्यामकांत मस्के, विवेकानंद काळकर, तहसीलदार रविंद्र महाले, वैशाली पाथरे, निकीता जावरकर, नायब तहसीलदार मधुकर धुळे, संजय मुलतकर यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.

‘भारत माता की जय’च्या घोषणांनी निनादले आसमंत, सुरक्षा पथकांच्या कवायतीला अमरावतीकरांची दाद

प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सुरक्षा पथकांनी केलेले शिस्तबध्द कवायत व पथसंचलनाला अमरावतीकरांनी मोठी दाद दिली. यावेळी ‘भारतमाता की जय’च्या घोषणांनी आसमंत निनादून गेले होते.

मुख्य ध्वजारोहण सोहळ्यानंतर विविध सुरक्षादलांच्या व  विभागांच्या चमूमार्फत शिस्तबध्द पथसंचलन करण्यात आले. त्यात  १७ पथकांनी भाग घेतला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टेडियममधील प्रेक्षागृह गर्दीने फुलून गेले होते.

राज्य राखीव पोलीस बल गट, अमरावती पोलीस आयुक्तालयाचे पोलीस पथक, ग्रामीण पोलीस पथक, महिलाविषयक गुन्हे व तक्रार निवारणासाठी दक्ष असलेले पथक, गृहरक्षक पुरुष तसेच महिला दल, शहर वाहतुक पथक, पोलीस बॅन्ड पथकाने दिमाखदार पथसंचलन करुन सर्वांची मने जिंकली.

स्कुल ऑफ स्कॉलर्स राजमाता जिजाबाई गाईड पथक तसेच स्वामी विवेकानंद स्काऊट पथक, केम्ब्रिज इंग्लिश स्कुल, जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कुल, दिपा इंग्लिश प्रायमरी स्कुल, अस्मिता विद्यालय यांचे स्काऊट गाईड यांनी आकर्षक पथसंचलन करुन मोठी दाद मिळविली. पथसंचलनामध्ये पोलिस विभागाचे श्वानपथक आकर्षणाचे मुख्य केंद्र होते. यावेळी श्वानाने सलामी देताच टाळ्यांचा कडकडाट झाला.  महिला आर्थिक विकास महामंडळाचा महिला शक्तीचा जागर करणारा देखावा लक्षवेधी ठरला.

जलद प्रतिसाद पथक, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, मनपा अग्निशामक वाहन तसेच बुलेट दुचाकी, दंगा नियंत्रण पथक ‘वज्र वाहन’, ‘वरुण वाहन’,  मनपा आरोग्य विभागाचे वाहन, परिवहन महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देणारी बस, जिल्हा आरोग्य रुग्णालय तसेच जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाची रुग्णवाहिका, सामाजिक वनीकरण विभाग, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा शोध व बचाव पथक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे पथक संचालनात सहभागी होते.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here