जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख सर्वांच्या सहकार्याने यापुढेही सुरु राहील- पालकमंत्री शंभूराज देसाई

0
12

सातारा, दि.२६ :  सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये अनेकांचे योगदान आहे. प्रगतीचा चढता आलेख सर्वांच्या सहकार्याने यापुढेही असाच सुरु राहील, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्री.  देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर पोलीस पथकाने त्यांना मानवंदना दिली.   यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र सैनिक व शहिद जवानांचे कुटुंबीय आणि नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते.

कृषी व सहकारामध्ये राज्यात जिल्ह्याचा नावलौकीक आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, सातारा जिल्हा हा स्वातंत्र सैनिकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात कोयना धरणातून वीज निर्मिती केली आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कास पुष्प पठार जागतिक पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांच्या विकासाबरोबर इतर पर्यटन स्थळांचाही विकास करण्यात येणार आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हा वार्षिक योजना सुमारे ६०० कोटीचा वाढीव आराखडा शासनास सादर केला आहे. देशाच्या साखर उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. यामध्ये सातारा जिल्हाही अग्रेसर आहे.

कोयना, धोम, कन्हेर, वीर अशा विविध धरणग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यात पर्यायी जमिनी वाटपासंदर्भात शासनाची भूमिका सकारात्मक आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन प्रश्न सोडविण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. सरकार सर्वसामान्याचे असून विकासाबाबत कुणाच्या सकारात्मक सूचना असतील तर त्या सांगाव्यात त्यांची अंमलबजावणी केली जाईल. तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढील काळात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे.

देशासह राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या प्रगतीमध्ये आपला जिल्हाही कुठे मागे पडू नये यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या सहकार्यातून जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवला जाईल, असे सांगून प्रजासत्ताक दिनाच्या जनतेला शुभेच्छाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सन्मान

या कार्यक्रमामध्ये शहिद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांना पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते ताम्रपटाचे वितरण करण्यात आले. पोलीस अधीक्षक समीर शेख व फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक-२०२१ देण्यात आले.

तसेच जिल्हा क्रीडा पुरस्कार, महाज्योती नागपूर संस्थेमार्फत प्राप्त झालेल्या टॅबलेट, डाटा सिम कार्डचे वाटप, स्कॉलरशिपमध्ये विशेष गुण घेवून प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारही पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते देण्यात आले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

दरम्यान प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवकालीन साहसी खेळांचे प्रात्यक्षिक, मल्लखांब व लेझीम यांचा समावेश होता. शिवकालीन साहसी खेळाने व मल्लखांब प्रात्यक्षिकाने एका प्रकारे ऊर्जा निर्माण केली. उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती

राज्यपरिवहन महामंडळ, वन विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेकडे असलेल्या विविध योजनांची माहिती जनतेला व्हावी यासाठी चित्ररथ तयार केले होते. या चित्ररथांनी प्रजासत्ताकदिनी झालेल्या संचालनाचे मुख्य आकर्षण ठरले.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here