संविधानिक मूल्यांची जपणूक करुया – पालकमंत्री संजय राठोड    

यवतमाळ दि.२६ : देशाला दिशा देणाऱ्या संविधानिक मूल्यांची जपणूक करत महाराष्ट्राला घडवण्यात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन आज अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी  केले.

पोस्टल ग्राऊंड येथे आयोजित भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात श्री. राठोड बोलत  होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कर्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक पवन बनसोड, यांच्यासह  राज्य  शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. राठोड म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला दिलेले संविधान हे सर्वोच्च स्थानी असून संविधानाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत हा देश विविध क्षेत्रांत प्रगती करीत आहे. प्रत्येक भारतीयांना अभिमान असलेल्या संविधानातील मूल्यांचा अंगीकार करून महाराष्ट्राचा विकास होत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिपणे पार पाडल्यास बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले राज्य व देश निर्माण होईल. त्याचबरोबर नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचाही समावेश आपल्या राज्यघटनेत करण्यात आला आहे. समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शोषणापासून संरक्षणाचा हक्क, धार्मिक निवड स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक स्वातंत्र्याचा हक्क, संविधानिक प्रतिकाराचा हक्क आदी मौल्यवान हक्क या घटनेने नागरिकांना बहाल केले आहेत असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी, श्री राठोड यांनी मुख्य कार्यक्रमस्थळी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले. त्यांनी यवतमाळ पोलीस, होमगार्ड, छात्रसेना, स्काऊट गाईड आदी  पथकांचे खुल्या जिप्सीमधून निरीक्षण केले. या सर्व पथकांनी मुख्य मंचासमोरून पथ संचलन केले. श्री. राठोड यांनी या सर्व पथकांची मानवंदना स्वीकारली.

 

यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मल्लखांबासह ताल योगासनांचे प्रात्यक्षिक तसेच विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. यावेळी आयएसओ मानांकन मिळाल्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, अमरावती विभागातून उत्कृष्ट उपजिल्हा निवडणुक अधिकारी म्हणुन मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाने पुरस्कृत केल्याबाबत उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, ७/१२ संगणकीकरणात उत्कृष्ट काम करणारे करळगाव येथील तलाठी आशिष पाचोरे यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी मेघना कवळी, अप्पर जिल्हाधिकारी पेअविण सिंह दुबे, अप्पर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तसेच सर्व प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते.

000