मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करा-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. २७: आर्थिक परिस्थितीमुळे जिल्ह्यातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याबाबत विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

यशदा येथे पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, माध्यमिक शिक्षण अधिकारी सुनंदा वाखारे, प्राथमिक शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड आदी उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात शाळेतील सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून यासाठी शासन सहकार्य करेल. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेला इमारती, संरक्षण भिंत, स्वच्छतागृहे आदी पायाभूत  सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून करण्यात येणाऱ्या खर्चात अधिक वाढ करण्यात येणार आहे. मुलींच्या खेळ व शिक्षणावर शासनाने विशेष लक्ष दिले आहे.  त्यांना अधिकच्या सुविधा मिळण्यासाठी  मुख्याध्यापकांनी प्रस्ताव सादर करावा.

श्री. पाटील पुढे म्हणाले,  छोट्या शाळेत प्रयोगशाळेसारखे खगोलशास्त्राचा अभ्यासाकरीता आभासी तारांगण उभारण्याच्या प्रयत्न करण्यात येणार आहे. मोठ्या शाळेत मिळणाऱ्या सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन आग्रही आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्येत वाढ होण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होणार आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

नवीन शैक्षणिक धोरणात पहिल्या इयत्तेआधी ३ वर्ष बालकांवर उत्तम संस्कार होण्याच्यादृष्टीने देशाची, भूगोलाची, राष्ट्रपुरुषांची माहिती होण्यासाठी त्यांच्या वयोमर्यादेचा विचार करुन अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. लहानपणी घेतलेल्या शिक्षणाचा परिणाम भविष्यात होत असतो. आगामी काळ गुणवत्तेचा असून विद्यार्थ्यांनी  गुणवत्ता संपादन करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

प्रस्ताविकात श्री. प्रसाद म्हणाले, शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सर्वात जास्त पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. जिल्हा परिषदेने चांगली कामगिरी करुन विद्यार्थी निवड संख्येत वाढ केली आहे. जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शासकीय, अनुदानित, खासगी शाळेत दहा कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘निपूण भारत’ कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात वर्षभरात दोन ते तीन वेळेस विद्यार्थीनिहाय सुक्ष्म अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात येतो. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे.

आचार्य विनोबा भावे ॲप तयार करण्यात आले आहे. शाळा सुधार कार्यक्रम जिल्ह्यात ३९७ शाळेत राबविण्यात येत असून या शाळा आदर्श शाळा करण्यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात पुणे जिल्हा अग्रेसर असून देशासाठी पथदर्शी कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे, असेही श्री प्रसाद म्हणाले.

पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पूर्व उच्च प्राथामिक व पूर्व माध्यमिक परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेले १०५ विद्यार्थी, इयत्ता १० वी १२ वी परीक्षेत देशात व राज्यात प्रथम क्रमांकाने यश संपादन केलेले १० विद्यार्थी, इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आणलेल्या ६ शाळा आणि जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवड झालेल्या शाळांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.

0000