अमरावती, दि. २८ : समन्वयित कृषी विकास प्रकल्पात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयातील लेखा सहायक संचालक दिगंबर नेमाडे यांचा विशेष पुरस्काराने गौरव राज्याचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांच्या हस्ते आज झाला.
लेखा व कोषागारे संचालनालयाच्या लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समितीतर्फे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेत श्री. नेमाडे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, आंतरराष्ट्रीय नौकानयन खेळाडू दत्तू भोकनळ, संचालक वैभव राजेघाटगे, संचालक माधव नागरगोजे, सहसंचालक शिल्पा पवार आदी यावेळी उपस्थित होते.
समन्वयित कृषी विकास प्रकल्पाद्वारे शेतकरी बांधवांसाठी शेततळे, नदी-नाले खोलीकरण, नेट शेड वाटप, गॅबियन बंधारे, मत्स्य बीज वाटप, बांबू लागवड, सौर कुंपण निर्मिती आदी विविध कामे राबवली गेली. या काळात त्याचे लेखाविषयक काम, आवश्यक तपासण्या, त्रुटी दूर करणे आदी कामांसाठी श्री. नेमाडे यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समितीतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
०००