मुंबई, दि. २९ : – विश्वचष्क पटकावून भारतीय महिला युवा क्रिकेट संघाने भारतीय महिलांच्या कर्तबगारीवर मोहोर उमटवणारी कामगिरी केली आहे. त्यामुळे हा भारतीय महिला युवा क्रिकेट संघ कौतुकास पात्र आहे. या विजयामुळे नव्या वर्षात भारतीयांनी एक चांगली भेट मिळाली आहे, या कौतुकोद्गारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला युवा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या १९ वर्षाखालील भारतीय महिला क्रिकेट युवा संघाचे अभिनंदन केले आहे.
भारतीय महिला संघाने केवळ ६७ धावांत इंग्लडच्या संघाचा धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भारतीय संघातील सर्वच खेळाडूंचे कौतुक केले आहे. हा विजय भारतातील क्रीडा क्षेत्रासह, सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या भगिनींचे मनोबल वाढवणारा ठरणार आहे. या विजयामुळे भारतीयांचा क्रिकेटमधील कामगिरीचा लौकिकही उंचावला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संघातील सर्व क्रिकेटपटूंचे, त्यांचे प्रशिक्षक तसेच मार्गदर्शकांचेही अभिनंदन केले आहे.