पाचव्या राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धांना सुरुवात – क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई, दि. 30 : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आजपासून पाचव्या राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. यानिमित्त महाराष्ट्राच्या संघाला क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्राचा संघ या स्पर्धेत पदकांचे त्रिशतक पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मंत्री श्री. महाजन यांनी म्हटले आहे, दोन वेळेचा विजेता महाराष्ट्र संघ पाचव्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत पदकांची विक्रमी कमाई करण्यासाठी सज्ज आहे. खो- खो स्पर्धेत पुरुष व महिला संघ चार वेळेस अजिंक्य ठरले असून महाराष्ट्राच्या खो-खो संघांना विजयी सलामीची संधी आहे.

२२ क्रीडा प्रकारांत महाराष्ट्राचे ३७७ खेळाडू सहभागी

या स्पर्धेच्या २२ क्रीडा प्रकारांत महाराष्ट्राच्या एकूण ३७७ सदस्यांचा संघ सहभागी होत आहे. यामध्ये टेबल टेनिस, खो- खो, बॉक्सिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन, तिरंदाजी, नेमबाजी, कयाकिंग व कनोइंग, योगासन, गटका, सायकलिंग ट्रॅक, ॲथलेटिक्स, कबड्डी, वेटलिफ्टिंग, लॉन टेनिस, मल्लखांब, तलवारबाजी, कुस्ती आणि जलतरण या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

दोन वेळेस महाराष्ट्र संघ अजिंक्य

आतापर्यंत दोन वेळेस महाराष्ट्राने २०० पेक्षा अधिक पदकांची कमाई केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र संघाचे लक्ष्य आता या स्पर्धेत पदकांचे त्रि शतक साजरे करण्यावर असेल. महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धांमधील कामगिरी उल्लेखनीय ठरलेली आहे. गुणवंत युवा खेळाडूंनी २०१९ आणि २०२० मध्ये महाराष्ट्राला अजिंक्यपदाचा बहुमान मिळवून दिला आहे. २०२० मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र संघाने विक्रमी २५६ पदकांची कमाई केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या संघाने ७८ सुवर्ण पदके पटकावली होती. २०१९ मध्ये पुणे येथील स्पर्धेत महाराष्ट्र संघ २२८ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी ठरला होता.

महाराष्ट्र सर्वसाधारण विजेतेपद मिळवेल : क्रीडा आयुक्त

गुजरात येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान युवा खेळाडूंनी यश संपादन केले आहे. याच कामगिरीत सातत्य ठेवत महाराष्ट्राचे खेळाडू मध्य प्रदेशातील खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये यश संपादन करतील. पुण्यात आयोजित सराव शिबिरातून हे खेळाडू तज्ज्ञ प्रशिक्षक आणि अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून आपल्या गुणवत्तेचा दर्जा उंचावत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र संघ निश्चितपणे या स्पर्धेदरम्यान सर्वसाधारण विजेते पदाचा मानकरी ठरेल, असा विश्वास क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी व्यक्त केला.

000

राजू धोत्रे/विसंअ/