कोयना प्रकल्पग्रस्तांसंदर्भात उच्चस्तरीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 31 : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना प्रकल्पामुळे बाधित झालेल्यांच्या पुनर्वसनासंदर्भात काही प्रश्न प्रलंबित आहेत. त्याबाबत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   यांच्या सूचनेनुसार उच्चस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी   पालकमंत्री   शंभूराज देसाई   तर उपाध्यक्षपदी कामगार मंत्री सुरेश खाडे हे असणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी  विश्वासाने ही जबाबदारी सोपविल्याबद्दल श्री. देसाई  यांनी त्यांचे मन:पूर्वक आभार मानले असून या समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून येत्या काळात कोयना प्रकल्पग्रस्तांच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक काम करू, असा विश्वासही  त्यांनी व्यक्त केला.

कोयना प्रकल्पाचे बाधित क्षेत्र हे प्रामुख्याने सातारा जिल्ह्यात आहे. कोयना प्रकल्पबाधितांचे काही अंशी प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी उच्चस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याबाबतची घोषणा   मुख्यमंत्र्यांनी   हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यानुसार ही उच्चस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. श्री. देसाई  यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत उपाध्यक्ष म्हणून कामगार मंत्री   सुरेश खाडे यांच्यासह सचिव पदी आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव आणि सदस्य म्हणून महसूल, जलसंपदा, सामान्य प्रशासन आणि वित्त या विभागांचे अपर मुख्य सचिव यांचा समावेश   आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, सरकार कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याकरिता कटिबद्ध असल्याचा  विश्वास  पालकमंत्री श्री. देसाई  यांनी व्यक्त केला आहे.

000