आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाच्या भूसंपादनाचे काम कालमर्यादेत पूर्ण करावे – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 31 : आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाची दुरूस्ती आणि मार्गातील प्रलंबित असलेले भूसंपादन कालमर्यादेत पूर्ण करून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पुढील कार्यवाहीसाठी सोपविण्यात यावे, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

आळंदी ते पंढरपूर रस्ता दुरूस्ती, बस स्थानक आगारातील स्वच्छता गृह, तालुका स्तरावर नवीन बस उपलब्ध करून देणे, रोना ते कोंडाळी महामार्गाचे बांधकाम, समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या, अतिवृष्टीमुळे पिकांचे होणारे नुकसान अशा विविध विषयांसंदर्भातील कामांचा आढावा मंत्री श्री. देसाई यांनी आज मंत्रालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, आळंदी ते पंढरपूर दरम्यान सासवड ते माळशिरस पर्यंतच्या पालखी महामार्गाच्या रस्त्याचे उर्वरित ३५ टक्के काम तातडीने पूर्ण करावे. समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना महामार्गालगतच्या नाल्यातील पाणी वळवावे जेणेकरून ते शेतात जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, त्यासाठी तातडीने नाले खोलीकरण, पर्यायी व्यवस्था करावी.

राज्य मार्ग परिवहन महामंडळातील स्थानक व आगारामधील विश्रांतीगृह तसेच स्वच्छतागृहे, बसची स्वच्छता आणि उपलब्धता करून देण्याचे काम प्राधान्याने करावे.

यावेळी आमदार सर्वश्री रणजितसिंह मोहिते-पाटील, दादाराव केचे, दीपक चव्हाण, राम सातपुते, परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भिमनवार, एसटी महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक विद्या भिलारकर, नागपूर महामार्ग अधीक्षक अभियंता आणि वर्धा, सोलापूर, आर्वी, नागपूर विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

सीना-कोळेगाव प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत आढावा

सीना नदीवरील करमाळा तालुक्यातील सीना-कोळेगाव प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने मंत्री श्री. देसाई यांनी आढावा बैठक घेतली. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीच्या अनुषंगाने यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच करमाळा तालुक्यातील ७ पुनर्वसित गावांतील वस्ती विखुरलेली असल्यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांना येणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर करण्याबाबतही यावेळी निर्देश दिले.

या बैठकीला आमदार  रणजितसिंह मोहिते-पाटील  उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गालगतच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी जाऊन ५४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. याबाबत मंत्री श्री. देसाई यांनी बैठक घेतली. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे. नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच यापुढे पावसाच्या पाण्याच्या योग्य निचरा व्हावा यादृष्टीने महामार्गालगत नाल्यांचे खोलीकरणाचे निर्देश त्यांनी दिले. याबाबत आमदार दादाराव केचे यांच्यासह मुख्य अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे निर्देश वर्धाच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला आमदार दादाराव केचे यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे वर्धा जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी, अधीक्षक अभियंता (समृद्धी महामार्ग), तसेच अमरावती विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

००००

शैलजा पाटील/विसंअ/