पर्यटन विकास महामंडळाच्या निवासात मिळणार तृणधान्यापासून तयार केलेले पदार्थ

मुंबई, दि. १ : संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’म्हणून जाहीर केले आहे. यानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळतर्फे राज्यभरातील पर्यटक निवासस्थानी तृणधान्य महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला.

तृणधान्यापासून तयार केलेले पदार्थ मिळणार

पर्यटन मंत्री श्री.लोढा म्हणाले की, बाजरी, ज्वारीच्या गरमागरम भाकरीसह, लसणाची चटणी आणि तृणधान्यापासून तयार केलेले विविध खाद्य पदार्थ आता महाराष्ट्र पर्यटन  विकास महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये मिळू शकणार आहेत. पौष्टिक तृणधान्यापासून तयार केलेले पदार्थ या निवासामध्ये उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना व्यवस्थापनाला दिल्या आहेत.

पर्यटन मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने राज्यात पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादनात वाढ करणे व या पिकांचे आरोग्यविषयक महत्त्व व आहारातील वापर वाढविण्याकरिता जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील,देशातील आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना महाराष्ट्र राज्यातील पौष्टिक तृणधान्यांची माहिती होईल आणि याचा आहारात वापर व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत राज्यात व राज्याबाहेरील ठिकाणीही या उपक्रमांचे वर्षभर आयोजन केले जाणार आहे. एमटीडीसीमार्फत महाराष्ट्र ‘मिलेट मिशन’ अंतर्गत तृणधान्यांपासून तयार केलेल्या  पदार्थांचे प्रात्यक्षिक व विक्री करणाऱ्या दालनाचे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात उभारण्यात आले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. तृणधान्य पदार्थ महोत्सव, दिल्ली हाट येथे पौष्टिक तृणधान्यांची पदार्थ विक्री, पर्यटक निवास औरंगाबाद येथे हुरडा महोत्सव, भंडारदरा, ग्रे पार्क नाशिक  येथे नाचणी महोत्सव, एमटीडीसी उपाहरगृह महाबळेश्वर, अजिंठा फूट हील, लोणार, बोधलकसा, ग्रेप पार्क, तारकर्ली आणि गणपतीपुळे येथील पर्यटक निवासस्थानी या महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे. पर्यटकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

या ऑनलाईन शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पर्यटन संचालक बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यावेळी उपस्थित होते.

महामंडळाच्या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात  हॉटेल मॅनेजमेंट दादर, मुंबई यांनी पौष्टिक तृणधान्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा स्टॉल लावला होता.या स्टॉलमध्ये या विद्यार्थ्यांनी तृणधान्यापासून बनविलेल्या चिपोतले राजमा मिश्र मिलेट टाकोज,काळा वाटाणा सांबर आणि मिलेट्स वडे, बाजरी नाचणी कुरमुरे भेळ पुरी, वरी तांदूळ आणि साबुदाणे वडे,ज्वारी बदाम पिस्ता कुकीज,नाचणी चोको चिप्स, कुकीज, आले – ओवा – बाजरी – खाऱ्या कुकीज या पदार्थांचा समावेश होता. गेले दोन दिवस लागलेल्या या स्टॉलमध्ये मंत्रालयातील अधिकारी,कर्मचारी व अभ्यागत यांनी या पदार्थांची चव चाखली.

******

संध्या गरवारे/विसंअ/