मुंबई, दि. १ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मांडलेला अर्थसंकल्प हा सामान्य नागरिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
मंत्री श्री. सामंत म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करीत असून सर्वसमावेशक विकास, वंचित घटनांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक, आर्थिक क्षेत्राचा विकास या सात विषयांवर लक्ष केंद्रित करणारा हा अर्थसंकल्प आहे. भारत जगातील १० व्या अर्थव्यवस्थेवरून ५ वी अर्थव्यवस्था झाली आहे.
उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा
या अर्थसंकल्पात उद्योग विभागासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. कोविडमध्ये नुकसान झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. छोट्या व मध्यम उद्योगांसाठी जाहीर करण्यात आलेली क्रेडिट रिव्हॅम्प स्किम १ एप्रिलपासून अंमलात येणार असून त्यासाठी ९ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा २ लाख कोटींच्या मोफत क्रेडिट गॅरंटी मिळण्यात फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्री श्री. सामंत म्हणाले, ७५ लाख कमावणाऱ्या व्यावसायिकांना करामध्ये सूट तर ३ कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या छोट्या उद्योगांना करामध्ये सूट देण्याचा निर्णय आजच्या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे स्टील इंडस्ट्रीला लागणाऱ्या कच्च्या मालासाठी ( Raw Material ) सवलत देण्यात येणार आहे. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ साठी मॉल बनविणार असून राज्याच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी युनिटी मॉल स्थापन करण्यात येणार आहे. राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी हा मॉल सुरू करण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पात मच्छिमार बांधवांसाठी ६ हजार कोटींची तरतूद केलेली आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या रकमेमध्ये ६६% आर्थिक वाढ केली असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे. मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती स्वस्त होणार असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
००००
विसंअ/अर्चना शंभरकर/उद्योग/