राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयी-सुविधांसाठी आराखडा तयार करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
8

मुंबई, दि. १ – राज्यातील बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, यादृष्टीने सर्व बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करा आणि त्या माध्यमातून दर्जेदार सोयी-सुविधांची निर्मिती करा, असे निर्देश मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत पणन विभागाचा आढावा घेण्यात आला. सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यादव यांचेसह राज्य वखार महामंडळ, पणन महासंघ, कृषी राज्य पणन मंडळ, ग्राहक महासंघ, कापूस उत्पादक पणन महासंघाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

काळाची गरज लक्षात घेता बाजार समित्यांचा पुनर्विकास करून तिथे येणारे शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी सोयी-सुविधा तयार करण्यात याव्यात.  पाणी, स्वच्छता, अंतर्गत रस्ते आदी सुविधांची निर्मिती करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.

पणन महासंघाच्या माध्यमातून शेतमालाला उत्तम भाव देण्यासोबतच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रिय खतांच्या निर्मितीला चालना द्या तसेच शेतीपूरक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देशदेखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

समृद्धी महामार्गालगत उभारण्यात आलेल्या ॲग्रो लॉजिस्टिक पार्कचा विस्तार करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी  वखार महामंडळ, पणन महासंघ, कृषी राज्य पणन मंडळ, ग्राहक महासंघ, कापूस उत्पादक पणन महासंघाच्या कामकाजाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here