राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा

मुंबई, दि. 3 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि फुटबॉल क्लब बायर्न यांच्यातील करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन निवडलेल्या खेळाडूंना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी  राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या “एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

फुटबॉल क्लब बायर्न यांच्याशी झालेल्या करारनाम्यामुळे राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल  स्पर्धा आयोजित करून, त्यातून निवडलेल्या २० खेळाडूंना म्युनिक, जर्मनी येथे जाणे-येणे, तेथील निवास, प्रशिक्षण इ. बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे. फुटबॉल क्लब बायर्न यांचा लोगो वापरण्याची मुभा दिलेली आहे. तसेच एफ. सी. बायर्न महाराष्ट्र करंडककरिता टी. व्ही ९ मराठी हे मीडिया पार्टनर आहेत.

राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांच्याशी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यावतीने करारनामा झाला आहे. बायर्न म्युनिक हा जागतिक पातळीवर लोकप्रिय फुटबॉल क्लबपैकी एक आहे. या करारनाम्यामुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल, खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांना फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबद्ध प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यांना चालना मिळणार आहे.

राज्यातून २० खेळाडू जर्मनी येथे या प्रशिक्षणासाठी जाण्याकरीता, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत “एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक” स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करण्यात येणार आहे. ही स्पर्धा १४ वर्षाखालील मुलांच्या गटात होईल. याकरीता जिल्ह्यातील १४ वर्षाखालील मुलांचे संघ जास्तीत जास्त सहभागी होतील यासाठी शाळांना अवगत करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत भाग घेण्याकरीता dsomumbaisub2020@gmail.com वर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर (शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, संभाजी नगर समोर आकुर्ली रोड, कांदिवली पू.) संपर्क क्रमांक – ०२२/२८८७११०५ येथे आपले अर्ज दि.०६/०२/२०२३ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत पाठवावेत. शैक्षणिक संस्था, शाळा, फुटबॉल संघटना व फुटबॉल क्लब यांनी या स्पर्धेत अधिकाधिक संघ सहभागी करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/