धुळे, दि. 5 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे शहरातील नागरिकांची सुरक्षितता अबाधित राखणे, धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांवर नियंत्रण ठेवणे, वाहतुकीचे नियंत्रण तसेच शहरातील संवदेनशील भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी धुळे पोलीस दलास आता सीसीटीव्ही ची मदत मिळणार आहे. शहरातील सहा पोलीस स्टेशन अंतर्गत लावण्यात आलेल्या 116 ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व पोलीस अधिक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे लोकार्पण आज राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अश्विनी पाटील, खासदार डॉ सुभाष भामरे, आमदार अमरिश पटेल, आ. जयकुमार रावल, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपमहापौर नागसेन बोरसे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.ऋषीकेश रेड्डी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
धुळे शहराच्या सुरक्षिततेसाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2020-21 मध्ये 5 कोटी 36 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन 2 कोटी 65 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला होता. या निधीतून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. तर सप्टेंबर 2022 मध्ये फायबर नेटवर्क तयार करुन सर्व कॅमेरे नियंत्रण कक्षात कनेक्ट करण्यात आली आहे. यांचे लोकार्पण आज पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पुढील काळात जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
धुळे शहर पोलीस स्टेशन हद्दीत 33, आझादनगर 20, देवपूर 31, देवपूर पश्चिम 14, चाळीसगाव रोड 10, मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीत 8 असे एकूण 116 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहे. तर या आर्थिक वर्षात साक्री, शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा या शहरांमध्येही सीसीटीव्ही सनिरिक्षण यंत्रणा बसविण्याचे काम सुरु करण्यात येणार असून यामुळे गुन्हेगारांवर वचक ठेवण्यास मदत होणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्री. बारकुंड यांनी यावेळी सांगितले.