मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना – जिल्हाधिकारी निधी चौधरी

0
31

मुंबई, दि. 7 : लोकाभिमुख प्रशासकीय कार्यप्रणालीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावरील कामे. त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ स्वीकारण्याकरीता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन  करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी  निधी चौधरी यांनी आज दिली.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी बोलत होत्या. तहसीलदार सचिन चौधरी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी म्हणाल्या की, प्रशासनात  लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी आणि नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. नागरिकांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात आपले अर्ज सादर करावेत. या कक्षामध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जांचा आढावा आणि कार्यवाही संदर्भात जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आढावा घेण्यात येईल.

नागरिकांनी ऑनलाईन सेवांचा लाभ घ्यावा. इतर विभागांच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारी संदर्भात ही कार्यवाही करण्यात येईल, असे सांगताना जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी म्हणाल्या की, मुख्यमंत्री सचिवालय कक्षामध्ये सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्री महोदयांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ स्वीकारुन (अर्धन्यायिक आणि न्यायिक कामकाजाची प्रकरणे वगळून) ही प्रकरणे जिल्हास्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी प्रकरणे जिल्हास्तरावरील विभाग प्रमुखाकडे वर्ग करुन तातडीने कार्यवाही  करण्यात येईल. तसेच ज्या प्रकरणी शासन स्तरावरून कार्यवाही होणे अपेक्षित आहे, यामध्ये सर्व वैयक्तिक तसेच धोरणात्मक अर्ज, संदर्भ व निवेदने मुख्य सचिव, मुख्यमंत्री सचिवालय यांना सादर करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी सांगितले.

000

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here