जर्मनी येथील प्रशिक्षणासाठी सांगलीच्या खेळाडूंनी स्थान मिळवावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

0
8

सांगली दि. 9 (जिमाका) :- एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करावी. या स्पर्धेतून निवडलेल्या खेळाडूंना जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार असून निवड होणाऱ्या खेळाडूंच्या चमुमधे सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी स्थान मिळवावे, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केली.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सांगली यांच्या वतीने आयोजित 14 वर्षाखालील जिल्हास्तरावरील एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा उद्घाटन सोहळाप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांच्यासह क्रीडा शिक्षक, विद्यार्थी व  क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, विद्यार्थ्यांमधील क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांना आवश्यक प्रशिक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाच्यावतीने या फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेतून 20 खेळाडूंची निवड करून त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी जर्मनी येथे पाठविण्यात येणार आहे.  खेळाडूंनी या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करुन क्रीडा क्षेत्रात लौकिक मिळवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या

या फुटबॉल स्पर्धेत जिल्ह्यातील 17 संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील विजेता संघ आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या संघातील 5 खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी यावेळी दिली.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here