पुणे दि.11: लोकसेवा हेच खरे अध्यात्म आहे, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो यासाठी काम करायला हवे ही शिकवण गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या महासत्संग सोहळ्यातून मिळते. शासनाच्या जनहिताच्या योजना अशा सोहळ्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतात आणि जनतेला त्याचा लाभ मिळतो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मोशी येथे आयोजित महासत्संग सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, संजय शिरसाठ, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, देहू संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. नितीन महाराज मोरे, आळंदी संस्थानचे विश्वस्त ॲड. विशाल ढगे पाटील, जेजुरी संस्थानचे विश्वस्त तुषार साने, पिंपरी चिंचवड संस्थानचे विश्वस्त तांबे महाराज, दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे ॲड. शिवराज कदम आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, गुरुमाऊलींचे लोककल्याणाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. दिंडोरी येथे सात दशकापासून सामाजिक सुधारणेसाठी सेवामार्ग, व्यसनमुक्ती, बालसंस्कार, महिला सक्षमीकरण, आयुर्वेद, स्वयंरोजगार, बिना हुंडा सामुहिक विवाह असे अनेक समाजाच्या हिताचे उपक्रम ते राबवितात. सामाजिक विकासाचे व्रत अंगिकारताना हजारो सेवा केंद्राच्या माध्यमातून विश्वशांतीचा संदेश देत भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा गौरव जगभरात पसरवत आहेत.
गुरुमाऊलींच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी शासन जनतेच्या समस्या सोडविण्याचे कार्य केले जाते. इथे येणारा प्रत्येक माणूस प्रत्येकाला काही तरी देऊन जाणारा आहे. म्हणून असा सोहळा ही समाजाची गरज आहे. परमेश्वराशी समाजाच्या उन्नतीसाठी इथे संवाद साधला जात असल्याने हा सोहळा खऱ्या अर्थाने महासत्संग ठरतो, अशा शब्दात श्री.शिंदे यांनी सोहळ्याच्या आयोजनाचे कौतुक केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गुरुमाऊली सांगत असलेला परमार्थ मार्ग जनतेच्या हिताचा, उन्नतीचा मार्ग आहे. दुसऱ्यासाठी जगण्यासाठी वेगळा आनंद असतो ही भावना सोहळ्यात सहभागी होऊन मिळते. आध्यात्माची जोड समाजाच्या उन्नतीसाठी घालण्याचा आदर्श प्रस्तूत करणारे हे कार्य असेच सुरू रहावे, अशा शब्दात त्यांनी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, आध्यत्मिकतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून माऊलींकडे बघितले जाते. माणसाची सेवा हाच परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग असल्याची शिकवण ते देत आहेत. कोरोना काळात त्यांनी केलेल्या सेवाकार्याने याची प्रचिती आली आहे. सत्संगाच्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याचे कार्य करण्यात येत आहे.
माऊली अण्णा साहेब मोरे म्हणाले, संतांनी, महापुरुषांनी दुसऱ्यासाठी जगण्याची शिकवण आपल्याला दिली असून ही शिकवण नवीन पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. घरातघरात आदर्श नागरिक तयार झाले पाहिजे, निर्व्यसनी पिढी तयार झाली पाहिजे. निसर्गाचे संरक्षण करुन त्यांचे संवर्धन करावे.