शासनामार्फत खेळाडूंसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देणार  –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. १२: महाराष्ट्र विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत असून शासनामार्फत खेळाडूंच्या विजयी वाटचालीसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित ‘बोरिवली खेल महोत्सव २०२३’ या ठिकाणी उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई), आमदार प्रवीण दरेकर, बोरीवलीचे आमदार आणि खेळ महोत्सवाचे संयोजक सुनील राणे, दहीसरच्या आमदार मनिषा चौधरी, कांदिवलीचे आमदार योगेश सागर, कुस्तीपटू तथा ॲथलिट नरसिंग पंचम यादव यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध उपक्रम सातत्याने राबवित असून खेळाडूंच्या कौशल्याची दखल घेऊन तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्यांना यापूर्वी  शासकीय सेवेत  नियुक्ती  दिलेल्या आहेत. नुकत्याच पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आपण महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी यासह कुस्तीमध्ये विविध किताब जिंकलेल्या खेळाडूंच्या मानधनात तीन पट वाढ केली आहे. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्रात खेळाडूंना चांगले प्रशिक्षक, उत्तम प्रशिक्षण सुविधा, शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक पोषणतत्वे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यासह सर्व पूरक  सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कुस्ती आपला पारंपरिक खेळ आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक कुस्तीमध्येचं मिळवून दिले होते. आताही आपले कुस्तीपटू वेगवेगळ्या ठिकाणी पदके मिळवत आहेत. खेलो इंडिया मध्येही विविध क्रीडा प्रकारांत  उत्कृष्ट कामगिरी आपल्या खेळाडूंनी बजावली असून सर्वाधिक पदके महाराष्ट्राने पटकावली आहेत, ही अभिमानास्पद  बाब आहे. याच पद्धतीने महाराष्ट्र भविष्यात उज्वल कामगिरी करत आपल्या देशाचे, राज्याचे नाव मोठे करेल,असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी जागतिक विजेता पृथ्वीराज पाटील आणि एशियन चॅम्पियन इरानचे हुसेन रमजानी यांची विशेष लढत यावेळी झाली.  या लढतीत विजयी झालेल्या पृथ्वीराज पाटीलचा आणि प्रतिस्पर्धी कुस्तीपटू  हुसेन रमजानीचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते फेटा ,गदा देऊन सत्कार करण्यात आला. रोमहर्षक कुस्ती या खेळ महोत्सवात बघायला मिळाली यात आपल्या महाराष्ट्र केसरीने इराणच्या कुस्तीपटूस पराभूत करून कुस्ती जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त करत दोन्ही कुस्तीपटूंना शुभेच्छा दिल्या.

000