शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३’चे आयोजन – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. १६ :- पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त १८ ते २० फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. या सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार उदयन राजे भोसले यांच्यासह पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती लाभणार आहे.

यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासोबतच महाराष्ट्राची लोकसंस्कृती व ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. पर्यटन विभागामार्फत राज्यातील महत्वाच्या उपक्रमांचे पर्यटन वेळापत्रक तयार केले असून त्याच उपक्रमांतर्गत यंदापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

या सोहळ्यात एक लाख शिवप्रेमी या उत्साहात सहभागी होतील  असे नियोजन शासनाकडून करण्यात आले आहे. किल्ले शिवनेरीवर जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याबरोबरच किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिवकालीन गाव’  हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असून या वर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या निमित्ताने शिव वंदना, स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबिर, विविध स्पर्धांचे आयोजन, पर्यटक आणि मान्यवरांसाठी सहलीचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

१८ फेब्रुवारी  रोजी सायंकाळी ६:३० वाजता ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३’ चे उद्घाटन होणार असून, सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेदरम्यान दिग्दर्शक अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ कार्यक्रम होणार आहे.  दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा होणार तर, ३ ते ५ वाजेदरम्यान शिववंदना होईल. सायंकाळी ६:१५ ते ७ वाजेदरम्यान महा शिवआरती कार्यक्रम होणार आहे. सायं. ७ ते रात्री १० वाजेदरम्यान ‘जाणता राजा’ या महानाट्याचा कार्यक्रम होईल. तसेच २० फेब्रुवारी रोजीही सायं.७ ते रात्री १० वाजेदरम्यान जाणता राजा कार्यक्रम होईल. तीनही दिवशी विविध बचतगटांची उत्पादने व खाद्यपदार्थांच्या ३०० स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा ३९३ वी जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर यावर्षी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राची ओळख जगभरात पोहोचली आहे. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेले गड-किल्ले जगभरातील पर्यटनप्रेमींचे मुख्य आकर्षण आहेत. यात शिवनेरी, रायगड व सिंधुदुर्ग हे महत्वाचे किल्ले आहेत. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य ही भावना आणि आपले वैभव नव्यापिढी पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. आपले आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीविषयी अभिमान व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे”, असे आवाहन मंत्री श्री.लोढा यांनी केले आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/