उद्योगांनी सी.एस.आर. निधी जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी खर्च करावा- पालकमंत्री संदीपान भुमरे

           औरंगाबाद दि 18 (जिमाका) आपल्या जिल्ह्यात अनेक उद्योग आहेत. उद्योगांना त्यांच्या नफ्यातील 2 टक्के निधी व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) म्हणून समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करावा लागतो. उद्योगांनी सामाजिक जबाबदारी म्हणून हा  निधी जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी खर्च करण्याचे आवाहन पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केले.

          पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील उद्योगांच्या सीएसआर निधीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, निवासी उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे तसेच विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

          जिल्ह्यातील उद्योग आपल्या सीएसआर मधून अनेक समाजोपयोगी कार्य करत आहेत. हे कार्य असेच सुरू राहावे. उद्योगांनी हे कार्य करत असतानाच  जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी निधी उपयोगात आणावा. जिल्हा प्रशासनासोबत समन्वय ठेवून पुढील आर्थिक वर्षातील निधी खर्चाचे नियोजन करावे. जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी सर्व उद्योगांनी  सहकार्य करण्याचे आवाहनही भुमरे यांनी केले.

          जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी अनेक उद्योग करत असलेल्या कामांचे कौतुक केले. उद्योगांनी 2 टक्के सीएसआर निधी मधील 0.5 टक्के एवढा निधी ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी खर्च करावा . उद्योगांनी आत्तापर्यंत किती निधी कोणत्या कामांसाठी खर्च केला याची माहिती जिल्हा प्रशासनाला सादर करण्याचे निर्देश  पाण्डेय यांनी दिले.

          उद्योगांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणे आवश्यक आहे. उद्योगांनी आपला निधी जिल्हा परिषदेच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम, दुरूस्ती तसेच संगणकीकरण करण्यासाठी खर्च करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले.