‘पंचमहाभूत बोध’ प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भरभरुन दाद

कोल्हापूर, दि. २० : कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली.

काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून निर्माते – दिग्दर्शक विजू माने यांनी तयार केलेल्या या प्रयोगाचे (कलाकृती) मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. अवघ्या २० मिनिटांमध्ये ५० कलाकारांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. पंचतत्त्वांचे सृष्टीसाठीचे महत्व, त्यांच्यावर होत असलेले परिणाम, पंचमहाभूतांच्या संरक्षणासाठी मानवी जीवनशैलीत अपेक्षित असलेल्या बदलांचा संदेश ‘पंचमहाभूत बोध’ प्रयोगातून देण्यात आला. यावेळी काडसिद्धेश्वर स्वामीजींनी ‘पंचमहाभूत संरक्षणाची शपथ’ उपस्थितांना दिली.

स्क्रीन, लेझर शो, नृत्य, नाट्य व स्पेशल इफेक्ट (अग्नी, वारा, पाऊस)चा वापर करुन तयार करण्यात आलेला हा राज्यातील पहिलाच संदेशपर प्रयोग असल्याची माहिती निर्माते – दिग्दर्शक श्री. माने यांनी दिली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केली विविध स्टॉलची पाहणी

कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे आयोजित ‘सुमंगलम् पंचमहाभूत’ या लोकोत्सवात उभारण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी स्टॉलची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली .

 

कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर, महसूल विभागातर्फे उभारण्यात आलेल्या स्टॉलचे दीप प्रज्वलन तर पर्यावरण व वातावरणीय बदल आणि प्रदूषण नियत्रंण मंडळाच्या स्टॉलचे फित कापून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते औपचारिकरित्या उद्घाटन करून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व्हॅनला हिरवा झेंडा दाखविला. हवामान बदलाचे परिणाम, कारणे व उपाय या अनुषंगाने या स्टॉलवर माहिती देण्यात येणार आहे. तर महसूल विभागाच्या स्टॉलवर विविध दाखले, फेरफार, नोंदणी आदींची सविस्तर माहिती या ठिकाणी नागरिकांकरिता उपलब्ध आहे. या स्टॉलच्या उभारणीबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, भय्याजी जोशी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, योगेश जाधव, हिंदुराव शेळके, माजी आमदार अमल महाडिक व सुरेश हळवणकर, समरजितसिंह घाटगे, विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

०००