कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): संपूर्ण विश्वापुढे पर्यावरणाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दिवसेंदिवस वैश्विक तापमान वाढत आहे त्यामुळे ऋतुमानात सातत्याने बदल होत आहेत. या बदलत्या ऋतुमानामुळे अनेक जागतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांना अटकाव करायचा असेल तर वेळीच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष द्यायला हवे. हे लक्ष देत असतानाच पर्यावरण संवर्धनासाठी लोक जागृती व लोकसहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले.
कोल्हापूरच्या कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवा’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘संत समागम एवं कुलपति समागम’ या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र गुंटूचे शिवाराथी देशिकेंच्या महास्वामी होते. यावेळी व्यासपीठावर गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भैय्या जोशी, आमदार सुभाष देशमुख, काडसिध्देश्वर स्वामी महाराज आदी उपस्थित होते.
गेहलोत पुढे म्हणाले की, संत, ऋषी, मुनी यांनी प्राचीन काळापासून पर्यावरण संवर्धनाचे महत्व विषद केले आहे. पर्यावरणाच्या मुद्याकडे आपणाला दुर्लक्ष करुन चालणार नाही. पर्यावरण रक्षणासाठी आपल्या सर्वांना कटिबध्द व्हावे लागेल. साधु, संतांच्या मार्गदर्शनात समाज आपले आचरण, अनुसरण करतो. या महोत्सवाकरिता उपस्थित असलेल्या साधु संतांनी पर्यावरणाच्या दृष्टीने समाजाला प्रेरित करावे. पर्यावरणाचे रक्षण करतानाच जल संरक्षणाकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचेही गेहलोत म्हणाले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ प्रदर्शन येणाऱ्या आगामी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. या प्रदर्शनाचे दृष्य परिणाम लवकरच दिसून येतील. हे प्रदर्शन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील ‘आत्मनिर्भर भारताचे’ प्रतिबिंब असल्याचे गौरवोग्दार काढून भारत विश्व गुरु होण्यासाठी येथे उपस्थित असलेल्या साधु संतांचे आशिर्वाद मिळावेत असे सांगून मुदत संपल्यानंतरही हे प्रदर्शन आणखीन पाच दिवस सुरु ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
श्री क्षेत्र गुंटूचे शिवाराथी देशिकेंच्या महास्वामी अध्यक्षस्थानावरुन बोलताना म्हणाले की, पंचमहाभूताचे अस्तित्व कोणालाही नाकारता येणार नाही. निसर्गाचे रक्षण करणे हे सर्वांचे परम कर्तव्य आहे. पृथ्वी प्रदूषित करण्याला जेवढे हात कारणीभूत आहेत त्याच्या दुप्पट हातांनी पृथ्वीचे पर्यायाने निसर्गाचे संवर्धन व्हावे, निसर्गाप्रती सर्वांच्या मनात आदर आणि जागृती निर्माण व्हावी. या संमेलनासाठी आतापर्यंत लाखो लोकांनी उपस्थिती दर्शविली यातच हा महोत्सव यशस्वी झाल्याचे दिसून येत असल्याचे गौरवोग्दारही त्यांनी यावेळी काढले.
हा महोत्सव यशस्वी केल्याप्रित्यर्थ सर्व साधु संतांच्या वतीने काडसिध्देश्वर स्वामी महाराज यांचा वेद घोषाच्या मंत्रात यावेळी गणेश मूर्ती व शाल देवून राज्यपाल गेहलोत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भैय्या जोशी यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले.
प्रारंभी काडसिध्देश्वर स्वामी महाराज यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बागय्याजी यांनी तर आभार प्रदर्शन स्वामी परमानंद यांनी केले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात देशभरातून आलेल्या विविध जाती-धर्माच्या साधू संतांचे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांच्या अनुषंगाने चर्चासत्र संपन्न झाले.