नाशिक, दिनांक: 23 फेब्रुवारी, 2023 (जिमाका नाशिक): जिल्हा परिषदेचा मिशन भगीरथ प्रयास उपक्रमातून जिल्ह्यातील दुष्काळी गावे भविष्यात निश्चितच पाणीदार होतील असा विश्वास व्यक्त करीत लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी करावा. त्याचप्रमाणे या उपक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाच्या निधीसोबतच 10 लाख रूपयांचा अतिरिक्त निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
आज गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषद नाशिकतर्फे अयोजित मिशन भगीरथ प्रयास उपक्रम कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड माणिकराव कोकाटे, डॉ. राहुल आहेर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन मुंडावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, मिशन भगीरथ प्रयास उपक्रमातून पिण्याच्या पाण्यासोबतच, शेती व सिंचनाचा प्रश्नमार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच मनरेगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार असून दुष्काळ काळात होणारे गावकऱ्यांचे स्थलांतर थांबणार आहे. लोकांनी स्वत:च्या गावाच्या विकासासाठी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्यास गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो. लोकसहभागातून काम करतांना गावातील जेष्ठ मंडळीचे अनुभव व मार्गदर्शन पुरक ठरणार असून त्यांच्या मार्गदर्शनातून पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची जागा निश्चित करण्यात यावी, असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री दादाजी भुसे पुढे म्हणाले, आज जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी समर्पित भावनेतून कोणताही शासनाचा निधी न घेता केलेल्या कार्यातून राजस्थानमधील गावांचे चित्र बदलले आहे. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचे मार्गदर्शन व प्रेरणा जर नाशिक जिल्ह्यास लाभली तर निश्चितच मिशन भगीरथ प्रयास उपक्रम यशस्वी होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावपातळीवर महिला सरपंच यांचा सहभाग वाढला पाहिजे, अशी आशाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिशन भगीरथ प्रयास अंतर्गत साधारण 200 गावांतून 705 कामांचे नियोजन करण्यात आले असून या कामांसाठी शासनाकडून निधीची उपलब्धता करण्यात येणार आहे. गावांतील नागरिकांनी या उपक्रमात उस्फूर्तपणे सहभागी होवून उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना केले.
शाश्वत प्रयत्नातून भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात – जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह
जिल्हा परिषदेमार्फत सुरू करण्यात आलेला मिशन भगीरथी उपक्रम स्थुत्य असून शाश्वत प्रयत्नातून भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी यावेळी केले. भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यााठी भूगर्भाचा अभ्यास, संशोधन करणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त आहे, योग्यस्थळे निश्चित करून भूगर्भात या पाण्याची साठवण झाल्यास गावागावातील पाणीप्रश्न सुटून उन्हाळ्यातील टँकर्सची संख्या कमी होऊन मिशन भागीरथ प्रयास यशस्वी होईल, असा विश्वासही यावेळी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मिशन भगीरथ प्रयास या उपक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी प्रास्ताविक केले. तर उपक्रमाची माहिती देणारे सादरीकरण जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे यांनी केले.