शेतकऱ्यांना शेतीसाठी अखंडितपणे वीज पुरवठा करण्यात यावा : पालकमंत्री दादाजी भुसे

0
8

नाशिक, दिनांक: 23 फेब्रुवारी, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : शेती पिकांचे पाण्याअभावी नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना अखंडितपणे वीज पुरवठा करण्यात यावा. तसेच नादुरुस्त रोहित्र तत्काळ दुरुस्त करण्यात यावेत, असे निर्देश राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

आयएमआरटी कॉलेजच्या सभागृहात महावितरण कंपनीची आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री भुसे बोलत होते. या बैठकीस आमदार देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, नितीन पवार, सुहास कांदे, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, महावितरणच्या नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता रमेश सानप, कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे, धनंजय आहेर, राजाराम डोंगरे, रवींद्र आव्हाड, जयंतीलाल भामरे, संजय तडवी, रामराव राठोड, सतीश बोंडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना पूर्वसूचना दिल्याशिवाय त्यांची वीज खंडित करू नये. वीज बिल वसुली काही काळासाठी थांबविण्यात यावी किंवा शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी.  शेतकऱ्यांना शेतीसाठी सलग सहा तास वीज पुरवठा पूर्ण दाबाने देण्यात यावा, जेणेकरून त्यांना शेतीला पाणी देता येणे शक्य होईल. त्याचप्रमाणे नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात यावेत, अशा सूचनाही पालकमंत्री श्री भुसे यांनी दिल्या.

नवीन सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर ज्या ठिकाणी मंजूर झाली आहेत तसेच ज्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, ती कामे प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे प्रलंबित कामांचा पाठपुरावा करून ती कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here