‘दिलखुलास’ कार्यक्रमात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत

0
9

मुंबई, दि. २४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात शालेय शिक्षण तसेच मराठी भाषा विभाग मंत्री दिपक केसरकर यांची मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सोमवार दि. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.

कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनी म्हणजेच दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने ‘मराठी भाषा’ हा स्वतंत्र प्रशासकीय विभाग सुरू केला असून, आपल्या मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा, तसेच अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे, पारंपरीक कला अभिव्यक्त व्हाव्यात यासाठी या दिनाचे औचित्य साधून या विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये मराठी भाषा भवन बांधण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, मराठी विश्वकोशाच्या जतन व संवर्धनासाठी अत्याधुनिक इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच मराठी भाषेच्या प्रसारासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक महानगरपालिका यांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या महानगरपालिकांना पुरस्कारही घोषित करण्यात आला आहे. देशात ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषा बोलली जाते त्या ठिकाणी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विशेष उपक्रमही राबविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे विविध व्यावसायिक अभ्यासक्रम मराठी भाषेतून सुरू करण्याबाबत विचार करण्यात येत आहे. अशा अनेक महत्वपूर्ण विषयांवर मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

0000

 

जयश्री कोल्हे/स.सं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here