ट्रेड ॲन्ड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुपच्या २८ ते ३० मार्च दरम्यान मुंबईत बैठका

मुंबई, दि. २८ : जी २० परिषदेच्या ट्रेड ॲन्ड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुपच्या बैठका २८ ते ३० मार्च दरम्यान मुंबई येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांचे नियोजन समन्वयाने करावे, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी आज येथे दिल्या.

जी २० परिषदेच्या ‘ट्रेड ॲन्ड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुप’ च्या बैठकांच्या तयारीबाबत आज बैठक झाली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीस राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव एल. सत्यनारायण सत्यमूर्ती, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, वाणिज्य मंत्रालयाचे सहसचिव डॉ. कृष्णन कुमार आदी उपस्थित होते.

बैठकीत सुरवातीला सहसचिव डॉ. कुमार यांनी मुंबईत होणाऱ्या बैठकांबाबत सविस्तर सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी बैठका होणारी ठिकाणे, शिष्टमंडळात येणारे प्रतिनिधी, त्यांची निवासाची व्यवस्था, प्रवासाची व्यवस्था याबाबत माहिती दिली.

शिष्टमंडळातील प्रतिनिधींचे विमानतळावरील आगमन ते परत जाण्यापर्यंत अतिशय नेटके नियोजन करावे. निवास व्यवस्था, निवास व्यवस्थेशेजारी वैद्यकीय व्यवस्था करण्यात यावी. निवास व्यवस्था ते बैठकांचे ठिकाण या दरम्यानच्या मार्गावर मुंबई आणि राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण पैलूंवर आधारित माहिती फलक लावावेत, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.

निवास व्यवस्थेच्या ठिकाणी पर्यटन आणि औद्योगिक विकासाच्या अनुषंगाने स्टॉल उभे करावेत. यामध्ये महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती, हस्तकला यांची माहिती देणारे स्टॉल असावेत. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची मदत घेण्यात यावी, सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करावे, यामध्ये महाराष्ट्रातील पारंपरिक कलांबरोबरच देशातील विविध प्रकारच्या कलांचे प्रदर्शन होईल, अशा अनुषंगाने नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीस राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, वाणिज्य मंत्रालयाचे उपसचिव आनंद भास्कर आदी उपस्थित होते.

०००

रवींद्र राऊत /विसंअ