नवी दिल्ली, दि. २८ : आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून राजधानी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या आदि महोत्सवाची केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या उपस्थितीत सोमवारी सांगता झाली. या ठिकाणी भरलेल्या प्रदर्शनात राज्यातील आदिवासी दालनांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
ध्यानचंद स्टेडियम येथे आदि महोत्सवाचे उद्घाटन 16 फेब्रुवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. या महोत्सवाच्या समारोपप्रसंगी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, ट्रॉयफेडचे अध्यक्ष रामसिंह राठवा उपस्थित होते.
राज्याच्या वतीने या ठिकाणी दालने उभारली होती. याअतंर्गत तीन वारली चित्रकारांची दालने, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींची दोन दालने, आदिवासी समाज जीवनातील खाद्य पदार्थांचे दालन, एक आदिवासी शेतकरी उत्पादित कंपनीच्या वस्तूंचे दालन आणि आणखी एक सेंद्रीय वस्तूंच्या उत्पादनाचा स्टॉलही होता. या दालनांना राजधानीतील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची प्रतिक्रिया स्टॉलधारकांनी दिली.
राज्याच्या दालनाला प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी भेट दिली होती. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनीही भेट दिली.
आदि महोत्सवामुळे आदिवासी कारागीरांना लाभ झाला असल्याचे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा सांगता सोहळ्यात म्हणाले. तीन कोटींपेक्षा अधिक आर्थिक व्यवहार या महोत्सवात झाला असल्याचे श्री. मुंडा यांनी सांगितले. याप्रसंगी सहभागी लाभार्थींना आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले.
200 पेक्षा अधिक दालने या महोत्सवात होती. याअंतर्गत आदिवासी समाजातील समृद्धता आणि सांस्कृतिक पंरपरेचे दर्शन घडविले गेले. हे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष (भरडधान्य/ श्री अन्न) म्हणून साजरे केले जात असल्यामुळे येथे आदिवासी समाजात रोजच्या आहारात वापरण्यात येणाऱ्या भरड धान्याचे दालन विशेष आकर्षण ठरले. तसेच हस्तकला, हातमाग, मातीची भांडी, दागदागिने, अलंकार, सजावटीच्या वस्तू इत्यादी आदि महोत्सवाचे आकर्षण होते.
०००००