शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

0
5

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १० वीच्या लेखी परीक्षांना उद्या गुरुवार दि. २ मार्च २०२३ पासून सुरूवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासन विविध उपाययोजना करीत असून विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने परीक्षा द्याव्यात, असे आवाहन करून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता १० वी साठी एकूण पाच हजार ३३ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी २३ हजार १० माध्यमिक शाळांमधून एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामध्ये आठ लाख ४४ हजार ११६ विद्यार्थी, तर ७ लाख ३३ हजार ६७ विद्यार्थिनी आहेत.

परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन मंत्री श्री. केसरकर यांनी केले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here