‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कॉर्नेल महा-६०’ उपक्रमातील नवउद्योजकांची दि. २ व ३ मार्च रोजी मुलाखत

मुंबई, दि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘कॉर्नेल महा-६०’ उपक्रमातील नवउद्योजक कार्तिक रायचुरा, राखी जैन, संतोष पापडे, मानसी काशिकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर गुरूवार  दि. २ मार्च,  शुक्रवार दि. ३ मार्च २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.

राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात एक सामंजस्य करार झाला असून याचा लाभ राज्यातील नवउद्योजकांना होणार आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क यांच्या सहयोगाने उद्योजकांसाठी मुंबईत जागतिक दर्जाचे बिझनेस अॅक्सिलेटर स्थापन करण्यात आले आहे.  भारतातील हा पहिलाच अॅक्सिलेटर उपक्रम आहे. या माध्यमातून ‘कॉर्नेल महा-६०’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत नुकतेच राज्यातील ६० निवडक तरूण उद्योजकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या नवउद्योजकांशी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून संवाद साधला आहे. कार्तिक रायचुरा, राखी जैन, संतोष पापडे, मानसी काशिकर या नवउद्योजकांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून उपयुक्त माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००