विषमुक्त शेतीला चालना देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील -‍ कृषी मंत्री अब्दुल सत्तार

0
6

सांगली दि. ३ (जि. मा. का.) : रासायनिक खते, औषधे यांच्या अतिवापरामुळे अनेक राज्यात कॅन्सरसारख्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. याचा गांर्भीयाने विचार करण्याची वेळ आता आली असून रासायनिक शेतीचे वाढलेले क्षेत्र व होत असलेले दुष्परिणाम ही चिंतेची आणि चिंतनाची बाब झाली आहे. त्यामुळे २५ लाख हेक्टर जमिनीवर यावर्षी विषमुक्त शेती करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यादृष्टीने राज्यात विषमुक्त शेतीला राज्य शासन चालना देत असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

विजयनगर सांगली येथे कृषी विभागाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या पुढारी ॲग्री पंढरी सिजन ३ प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, पुढारी पब्लीकेशनचे समुह सरव्यवस्थापक अनिल पाटील, कार्यकारी संपादक विजय जाधव, ऑरबिट क्रॉप न्युट्रीयंट्स संचालक दीपक राजमाने, डॉ. रवींद्र आरळी, रॉनिक स्मार्ट कोल्हापूरचे संचालक तानाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

रशिया-युक्रेन युध्दामुळे जागतिक स्तरावर मंदीचे सावट आहे. अशा काळात शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगून कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शेतकरी आत्महऱ्या महाराष्ट्रात होवू नयेत यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १२ हजार कोटी रूपयांची मदत केली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असणाऱ्या एनडीआरएफच्या निकषामध्ये बदल करण्यात आला आहे. अशावेळी महाराष्ट्रातील गोरगरीब, कोरडवाहू शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि विषमुक्त शेतीबाबत अचूक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारची कृषि प्रदर्शने महत्त्वपूर्ण ठरतील. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर याचा लाभ घ्यावा.

जिल्ह्यात बोगस बी-बियाणे, खते, औषधे येणार नाहीत व शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही यादृष्टीने कृषी विभागाने दक्षता घ्यावी, असे सांगून कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, सातत्याने हवामानात होत असलेल्या बदलामुळे पिकांवर अचानक येणाऱ्या वेगवेगळ्या रोगांच्या निवारणासाठी कृषी विद्यापीठांनी संशोधन करून शेतकऱ्यांना अचूक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे. पश्चिम महाराष्ट्रातील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर क्षारपड झाले आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. नापिकीची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यात येत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

यावेळी कृषि प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या काकडी, मिरची, घेवडा, मका, वटाणा, झेंडू, झुकिनी अशा विविध पिकांच्या प्लॉटस्‌ना कृषी मंत्र्यांनी भेट देवून पहाणी केली, माहिती घेतली. त्याचा बाजारभाव, पिकावर पडणारे रोग याबाबत सविस्तर चर्चा केली. या कार्यक्रमात मंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष, ऊस आदींचे चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रदर्शनात २०० पेक्षा अधिक कृषी विषयक स्टॉल्स उभारण्यात आले असून हे प्रदर्शन पाच दिवस चालणार आहे. नागरिकांनी याचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी केले.

पुढारी पब्लीकेशनचे समुह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यकारी संपादक विजय जाधव यांनी आभार मानले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here