सोलापूर, दि. ०४, (जि. मा. का.) : पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावत असतात. अशा वेळी त्यांना चांगल्या सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक असते. पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत पोलीस दलास आधुनिकीकरणासाठी सर्व सुविधा व अत्यावश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे आधुनिकीकरण समाज हितासाठी असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केले.
ग्रामीण पोलीस दल अंतर्गत करकंब पोलीस ठाणे येथील नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक – निंबाळकर, आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु तसेच मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, गुन्हेगारी, आर्थिक घोटाळे अशा सर्व प्रकारच्या आव्हानांना आपले पोलीस दल सक्षमपणे सामोरे जात आहे. पोलीस स्टेशन म्हणजे सर्वसामान्यांना न्याय देणारी हक्काची जागा आहे. पोलीस यंत्रणेत आलेल्या आधुनिक यंत्रणेमुळे नागरिकांना पोलीस स्टेशनला न येता ते ऑनलाईनही तक्रार करू शकतात. सध्या पोलीस यंत्रणेतील विविध बदल कौतुकास्पद आहेत. पोलिसांनी कर्तव्य बजावताना आपल्या आरोग्याची ही काळजी घ्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस ठाण्यात लोकांची गैरसोय होऊ नये, गुन्हा नोंद करण्याऐवजी मार्ग काढून वाद मिटवावेत, अशी अपेक्षा खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केली.
पोलिसांनी मदत करून स्थानिक पातळीवर वाद मिटविले तर लोकांचा वेळ, पैसा वाचतो. त्यासाठी करकंब पोलीस ठाणे येथे प्रयत्न होत असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले. तर मानवाच्या गरजेसाठी आणि कायदा व सुव्यवस्थेची पोलीस दलाची गरज आहे. करकंब सारख्या गावात अत्याधुनिक पोलीस ठाणे निर्माण झाले आहे. पोलिसांच्या घराचा प्रश्न सुटण्याची गरज प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केली.
करकंब पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीस 116.32 लक्ष रुपये इतका खर्च आला असून, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या पोलीस ठाण्यात तपास अधिकारी कक्ष, शस्त्रगार कक्ष, गोपनीय कक्ष, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदि सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच कैद्यासाठी तीन कारागृह कोठड्या बांधण्यात आल्या आहेत. करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत 27 गावांचा समावेश असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.
कार्यक्रमास पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.