श्री श्री रविशंकर ग्रामीण विकास संस्थेच्या कौशल्य विकास केंद्राचा कृषिमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

0
10

अमरावती, दि. ४ : श्री श्री रविशंकर ग्रामीण विकास संस्थेच्या प्रेमकिशोर सिकची कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज वलगाव येथे झाला. केंद्राद्वारे कुशल मनुष्यबळनिर्मिती होऊन ग्रामीण युवक, महिलाभगिनी यांच्यासाठी रोजगारनिर्मितीला चालना देणारे ठरेल, असा विश्वास श्री. सत्तार यांनी यावेळी  व्यक्त केला.

सिकची रिसॉर्ट येथे हा कार्यक्रम झाला. खासदार डॉ. अनिल बोंडे, केंद्राचे अध्यक्ष प्रेमकिशोर सिकची, वलगावचे सरपंच सुधीर उगले , कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान आदी उपस्थित होते.

कृषिमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, सिकची ट्रस्टतर्फे शेतकरी, कष्टकरी, महिलाभगिनी, विद्यार्थी यांच्यासाठी अनेक उत्तमोत्तम उपक्रम राबविण्यात येत आहेत. संस्थेची ही कामगिरी कौतुकास्पद आहे.

शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाकडून कृषी योजनांची भरीव अंमलबजावणी होत आहे. आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास मिळणाऱ्या मदतीचे प्रमाण वाढवून देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाकडून एनडीआरएफच्या मापदंडानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी वाढीव निधी वितरित करण्याचा निर्णय झाला. कृषी यांत्रिकीकरणात जिल्ह्यात सुमारे 330 कोटी निधीतून शेती अवजारे, ट्रॅक्टर आदी साधने शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली. शासनाकडून गत सहा महिन्याचा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, खासदार डॉ. बोंडे यांनी सांगितले.

कृषिमंत्र्यांकडून स्वयंचलित पोल्ट्री प्रकल्पाची पाहणी

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज अंजनगाव बारी येथील प्रगतीशील शेतकरी रवींद्र मेटकर यांच्या स्वयंचलित पोल्ट्री फार्मला भेट देऊन पाहणी केली.

खासदार डॉ. अनिल बोंडे, कृषी सहसंचालक किसनराव मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान आदी उपस्थित होते.

प्रयोगशीलतेची कास धरून शेती व पूरक व्यवसायात प्रकल्प उभारणाऱ्या शेतकरी श्री. मेटकर यांचे कृषिमंत्र्यांनी कौतुक केले. असे प्रयोग व प्रकल्प ठिकठिकाणी उभे राहावेत जेणेकरून कृषी क्षेत्राचा अधिकाधिक विकास होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

फार्ममधील कुक्कुट प्रकल्प, क्षमता, बाजारपेठ, आवश्यक बाबी, प्रयोगशील पीके आदी विविध बाबींची माहिती कृषिमंत्र्यांनी यावेळी घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here