वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी जेनेरिक मेडिसीनची जनजागृती करावी-पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 6 (जि.मा.का.) : जेनेरिक मेडीसीनबाबत लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असून यासाठी आरोग्य विभाग व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी जनजागृती करावी. रुग्णांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याने या औषधांचा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

आरोग्य विभाग व जन स्वास्थ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जन औषधी दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त श्वास हॉस्पिटल येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, श्वास हॉस्पिटलचे डॉ. अनिल मडके यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, गरिबांना स्वस्त किंमतीत औषधे उपलब्ध व्हावीत, औषधाअभावी कोणीही वंचित राहू नये यासाठी जन औषधी केंद्र सुरू करण्यास केंद्र शासनाने प्राधान्य दिले असून प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना अंतर्गत हे काम सुरु आहे. गोरगरीब सामान्य माणसाचे आरोग्याचे हित जपण्यासाठी शासनाने ही योजना आणली आहे, असेही पालकमंत्री डॉ. खाडे यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जेनेरिक मेडिसीनबाबत लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी पुढे यावे. या मेडिसीनबाबत लोकांमध्ये जनजागृती करून जेनेरिक मेडिसीनच स्वतः वापर करून सामान्य व गरीब रुग्णालाही  ही औषधे वापरण्यासाठी सल्ला द्यावा. डॉक्टरांनी जेनेरिक मेडिसिन प्रिस्क्रीप्शन लिहावे तसेच जेनेरिक मेडिसीन केंद्राच्या बाहेर औषधांचे दरपत्रक लावावे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले.

डॉ.‍ अनिल मडके  यांनी प्रास्ताविकात जेनेरिक मेडिसीनबाबत माहिती दिली.

तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी  प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना अंतर्गत डॉ. अनिल मडके यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रास भेट दिली.

०००००