कामगारांच्या घरासाठी म्हाडा एजन्सी म्हणून काम करेल; मार्च अखेरपर्यंत आराखडा सादर करा-कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 6 (जि. मा. का.) : कामगाराला स्वत:चा हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांसाठी अटल आवास योजना राबविण्यात येत आहेत. कामगारांच्या घरकुल योजनांसाठी आता म्हाडा एजन्सी म्हणून काम करणार आहे. त्यामुळे कामगारांच्या घरांचे आराखडे मार्च अखेर सादर करावेत, अशा सूचना कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिल्या.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत सांगली जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शहर व ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या घरकुल योजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कामगार मंत्री डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, डॉ. समीर शिंगटे, संतोष भोर, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, मिरज तहसिलदार दगडू कुंभार, अपर तहसिलदार डॉ. अर्चना देशमुख यांच्यासह म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.

इमारत व इतर बांधकाम कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाला जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जमिनीवर घरकुले बांधण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेवून तातडीने आराखडे सादर करावेत, अशा सूचना करून कामगार मंत्री डॉ. खाडे म्हणाले, जागा उपलब्धतेसाठी काही अडचण निर्माण झाल्यास महसूल विभागाशी म्हाडाने संपर्क साधावा. ज्या कामगारांनी घरकुलासाठी नाव नोंदणी केली आहे त्यांना अन्य घरकुल योजनांमधून घरकुल मिळाले किंवा नाही याची कामगार विभागाने शहानिशा करावी. महानगरपालिका क्षेत्रात काम करताना महानगरपालिकेचा यामध्ये सहभाग घ्यावा.

या बैठकीत कामगार भवन, कामगार कला भवन, कामगारांसाठी ईएसआयसी हॉस्पीटल, कामगारांच्या मुलांसाठी मेडीकल कॉलेज या उपक्रमांना गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

महानगरपालिका, नगरपालिका यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर लाभार्थी यादी व माहिती उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.