विधानपरिषद कामकाज

0
5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 9 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शरणापूर, साजापूर, पंढरपूर, नक्षत्रवाडी  असा राज्यमार्ग असून, तातडीने या रस्त्याचे काम सुरू करणार असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत दिली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काम पूर्ण करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे विलंब होत असल्याप्रकरणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यास उत्तर देताना मंत्री श्री. चव्हाण बोलत होते.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रस्त्याचे रूंदीकरण तसेच चार पदरी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यासंदर्भात निविदा प्राप्त असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करून तातडीने काम सुरू करण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या इमारतीच्या कामाबाबत कार्यादेश दिला असून, फेब्रुवारी २०२५ ला हे काम पूर्ण होईल. तसेच विश्रामगृहाचे काम ही २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे.

विविध विभागाची कामे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ठेकेदार करत असतात. सर्व विभागांनी एकत्रित काम करणे गरजेचे असल्याने त्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसीत करण्यात येईल. यामुळे ठेकेदार काम अपूर्ण ठेवण्याच्या पद्धतीला आळा बसणार आहे. तसेच या सॉफ्टवेअरमुळे ठेकेदार निविदा भरतानाच  ती माहिती सर्व विभागांना मिळेल.

ठेकेदारामुळे काम अपूर्ण राहिले असेल किंवा क्षमता नसताना निविदा दिली असल्यास त्यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

राज्यातील मासळी उतरविण्याची ४३ ठिकाणे  गाळ उपासणी क्षेत्रासाठी निश्चित – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि. 9 : राज्यात मासळी उतरविण्याची 173 बंदरे कार्यरत आहेत. या  बंदरांमधील गाळ काढून 24 तास ही बंदरे सुरु ठेवण्याच्या कामांचे सर्वेक्षण करण्यात आले असून राज्यात 43 ठिकाणे गाळ उपासणी क्षेत्र निश्चित करण्यात आले असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत सांगितले.

राज्यातील मत्स्य बंदरामधील गाळ काढून बंदरे सुस्थितीत करण्याबाबत सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री श्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत हर्णे, साखरी नाटे, जीवना, भरडखोल, सातपाटी ही पाच कामे करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक त्या सर्व पूरक परवानगी घेण्यात येत आहेत. तसेच ही कामे विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश मेरीटाईम बोर्डाला देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मागील दोन वर्षात लेखाशीर्षअभावी ही कामे प्रलंबित राहिली होती. त्यामुळे प्राधान्याने लेखाशीर्ष उघडण्याची कार्यवाही केली जाईल. तसेच सन 2018 च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत हे 12 वे काम घेण्यासाठी अनुमती देण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच राज्यातील समुद्र किनारा असलेल्या सात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन मत्स्यव्यवसायाशी संबंधित सर्व प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी चर्चा करण्यात येऊन धोरण निश्चित करण्यात येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे, सचिन अहिर, रमेश पाटील यांनी सहभाग घेतला.

००००

मनीषा पिंगळे/विसंअ/

कालावधीपूर्वी गाळप केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करणार – सहकारमंत्री अतुल सावे

मुंबई दि.  9 – पुणे येथील बारामती ॲग्रो लि. शेटफळ या साखर कारखान्याने गळित हंगामाच्या प्रारंभीची निश्चित तारखेच्यापूर्वी गाळपास सुरुवात करून कारखान्यास वितरित करण्यात आलेल्या गाळप परवान्यामध्ये नमूद अटी शर्तींचा भंग केल्याने कायदेशीर सल्ल्यानुसार  सदर कार्यकारी संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सविस्तर अहवाल मागविला असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.

१५ ऑक्टोबरपूर्वी ऊस गाळप हंगाम सुरू करून कायद्याचा भंग केल्याप्रकरणी बारामती ॲग्रो लि. शेटफळ या साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात सदस्य प्रा.राम शिंदे यांनी लक्षवेधी मांडली. यास उत्तर देताना सहकार मंत्री अतुल सावे बोलत होते.

मंत्री सावे म्हणाले, संबंधित साखर कारखान्याने वेळेपूर्वी गाळप सुरू केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.  तसेच, किती गाळप करण्यात आले याचा अहवाल मागवून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री सावे यांनी दिली.

0000

श्रद्धा मेश्राम/स.सं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here