कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याकरिता शिक्षण विभागाचा ‘ॲमेझॉन’सोबत करार

मुंबई, दि. 11 – कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. या उद्देशाने राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर इनिशिएटिव्ह तसेच लीडरशिप फॉर इक्विटी या दोन संस्थांसमवेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या ई-उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला अनुसरून समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा तयार करणे आणि एकात्मिक अभ्यासक्रम तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद या नऊ जिल्ह्यात हा उपक्रम सुरू करण्यात येत असून एक लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. भविष्यात रोजगार मिळविण्यासाठीच्या स्पर्धात्मकयुगात विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.