मधमाशीला राज्य कीटकाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्नशील :  रवींद्र साठे

सातारा दि. १२ :  मधमाशीला राज्य कीटकाचा दर्जा मिळावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून  मधमाशीच्या परागीकरणाद्वारे होणारी कृषी उत्पादनातील वाढ व त्यामधे मध माशांचे अनन्यसाधरण महत्त्व लक्षात घेता मधमाशी उद्योग महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले.  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि महाराष्ट्र राज्य औषधी वनस्पती मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा मध संचालनालय, महाबळेश्वर येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

उपस्थित शेतकरी मधमाशी पालनांना संबोधित करताना साठे म्हणाले की,  राज्य शासनाची मध केंद्र योजना सर्व समावेशक व सर्व घटकांसाठी असून ५० टक्के अनुदान देण्यात येते. लाभार्थीनी उत्पादित केलेल्या मध व मेणाची खरेदी मंडळ हमी भावाने करत आहे. नुकतेच मंडळाने खरेदीचे हमी भावात भरघोस वाढ केली असून आता सेंद्रिय मध खरेदी दर रू.४००/- वरून रू.५००/- , सातेरी मध खरेदी दर रू.३४५/- वरून रू.४००/- तर मेण खरेदी दर रू.१७०/- वरून रू.३००/- प्रती किलोग्राम, मेलिफेरा मधाचे दरही वाढविण्यात आला आहे .

सातेरी मध माशा वसाहत खरेदी दर रू.२७००/- वरून रू ३०००/- प्रती वसाहत या प्रमाणे दर वाढविण्यात आल्याची घोषणा केली व जास्तीत जास्त मधपालनांनी मंडळाकडे मध विक्री करावा, असे आवाहन केले.

महाराष्ट्र राज्य औषधी वनस्पती मंडळ पुणेचे उप संचालक प्रवीण गवांदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या व केंद्र सरकारच्या विविध योजनां बद्दलची माहिती दिली. कृषी विभाग अंतर्गत मधुक्रांती पोर्टलद्वारे ऑनलाईन नाव नोंदणी करून केंद्र सरकारच्या मध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

संचालनालयाचे  संचालक दिग्विजय पाटील म्हणाले की, मध उद्योगाला खऱ्या अर्थाने चालना मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी मधमाशी पालन करणे व त्यांचे संवर्धन करणे फार महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमास  उपविभागीय कृषि अधिकारी वाई तेजदीप ढगे, तालुका कृषी अधिकारी नितीन पवार, तंत्र अधिकारी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय सातारा समीर पवार, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी निसार तांबोळी,  अध्यक्ष मधुसागर संजय पारटे, नाना जाधव, श्री. नारायणकर, श्रीमती शारदा बावळेकर तसेच सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे २०० मधुमक्षिकालक शेतकरी उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात, प्रा.हेमंतकुमार डुंबरे यांनी मध माशा व्यवस्थापन ,श्री.आर. पी. नारायणकर यांनी राज्यातील मध योजना, सौ. शारदा अनिल बावळेकर यांनी मधमाशा पालनातील उप उत्पादने, श्री.संजय कांबळे यांनी मध प्रक्रिया, मधाची साठवणूक व निगा राखणे इत्यादी विषयावर व्याख्यान दिले विजय कुंभरे यांनी मध माशा संगोपन प्रात्यक्षिके सादर केली.

यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप व  अर्थ सल्लागार व मुख्य लेखाधिकारी विद्यासागर हिरमुखे यांची भाषणे झाली.

०००