विधानसभा लक्षवेधी

0
7

वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.१३ :वीज निर्मितीकरिता लागणारे कोळशाचे दर वाढले आहेत. वीज दर ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाकडे नसला, तरीही शासन वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.            याबाबत विधानसभा सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वीज वितरण परवानाधारक कंपनीस  आपल्या कंपनीच्या कार्यक्षेत्रातील ठराविक भागांचा वीज वितरण कारभार सांभाळण्यासाठी फ्रेंन्चाइझी नियुक्ती करण्याची तरतूद आहे. ज्या विभागांत वीज गळतीचे प्रमाण जास्त आहे, वीज बिल वसुलीचे प्रमाण कमी आहे तसेच वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, अशा व इतर सर्वसमावेशक बाबींचा विचार करुन असे विभाग फ्रेंन्चाइझी तत्वावर खाजगी कंपनीस ठराविक कालावधीकरिता देण्याचा धोरणात्मक निर्णय ‘महावितरण’ने घेतला आहे. त्यानुसार महावितरणच्या भिवंडी मंडळांतर्गतची विद्युत वितरण व देखभाल व्यवस्था मे. टोरंट पॉवर कंपनी लिमिटेडला वितरण फ्रेंन्चाइझी म्हणून हस्तांतरित करण्यात आलेली आहे.

वीज मीटर रीडिंग घेणारे कंत्राटदार कर्मचारी यांना ड्रेस कोड ,ओळखपत्र देण्याच्या सूचना संबंधित कंपनीला देण्यात येतील.कंत्राटदार कर्मचारी जबरदस्ती करीत असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच रमजान सणाला लोडशेडिंग करण्यात येऊ नये अशा सूचनाही देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

या चर्चेमध्ये विधानसभा सदस्य अबू आझमी,मुक्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिफ,अस्लम शेख यांनी सहभाग घेतला.

000000

राजू धोत्रे/विंसअ

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या नऊ महिन्यांत पूर्ण होईल

– सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. १३ : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी आवश्यक भूसंपादन पूर्ण न झाल्याने कामाला विलंब होत होता. परंतु हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच शासनाची भूमिका आहे. येत्या ९ महिन्यांत या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य आदिती तटकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, महामार्गाचे पनवेल ते कासु व कासु ते इंदापूर हे सुमारे ८४ किमीचे रखडलेले काम युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. भूसंपादन, विविध खात्याची परवानगी मिळवणे, परवानग्या घेऊन कामाला प्रत्यक्ष सुरुवात करणे यासाठी बराच कालावधी उलटून गेला आहे. या कामासाठी वेगवेगळ्या भागात जाऊन तेथील अडचणी प्रत्यक्षात समजून घेऊन जलद गतीने काम करण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे, असेही मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अमित साटम, सुनील प्रभू, वैभव नाईक यांनी सहभाग घेतला.

००००

शैलजा पाटील/विसंअ

सायबर सिक्युरिटीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.१३ : राज्यात सायबर सुरक्षा अतिशय महत्त्वाची असून यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य जयकुमार रावल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, धुळे शहरात मोबाईल वरून शहरातील मुलींचे छुप्या पध्दतीने छायाचित्रे काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी अज्ञात असून पुढील चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे.

छुप्या पध्दतीने छायाचित्रे काढण्याविषयी तसेच इतर विविध गुन्ह्यांविषयी सायबर कायदे जुने असून माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये बदल करण्याची सूचना केंद्राला पाठविण्यात येणार आहे.राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य रईस शेख, प्रा.वर्षा गायकवाड यांनी सहभाग घेतला.

000

राजू धोत्रे/विसंअ

राज्यासाठी लवकरच गौण खनिज धोरण आणि वाळू

धोरण – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरता लवकरच गौण खनिज धोरण आणि वाळू धोरण जाहीर करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मौजे तडवळ येथे अवैध पद्धतीने स्टोन क्रशर सुरु असून या माध्यमातून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यासंदर्भात सदस्य शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी मंत्री श्री. विखे पाटील यांनी ही माहिती दिली.

राज्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपशाला आळा घालण्यासाठी शासनामार्फत वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत असतात. परंतु, असे असतानाही राज्यात नियमबाह्य उत्खनन होत असेल आणि त्यांच्यावर कारवाई होत नसेल, तर संबंधित यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल, असे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करुन स्टोन क्रशर चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.

०००

मनीषा पिंगळे/विसंअ

 

राज्यातील ३४ किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांकरिता जन-सुविधा केंद्राची

उभारणी करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” कार्यक्रमांतर्गत राज्यातील ३४ किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांकरीता जन-सुविधा केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या जनसुविधा केंद्रात पुरुष-महिला स्वच्छतागृह, शिशू काळजी केंद्र, अल्पोपहार केंद्र इत्यादी सोयीसुविधांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य संग्राम थोपटे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील ३८७ स्मारकांच्या ठिकाणी क्यूआर कोडसह त्या-त्या स्मारकाची पूर्ण माहिती असणारे फलक लावण्यात येणार आहेत. जेणेकरून स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना त्या स्मारकाची माहिती मिळेल. गड किल्ल्याचे पावित्र्य आणि स्वच्छता राखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये पावित्र्य भंग करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तर स्मारकांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांची माहिती सांगणाऱ्यांना बक्षीस देखील देण्यात येणार आहे.

केंद्र संरक्षित शिवनेरी, सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यांसाठी सर्वंकष स्थळ विकास आराखडा तयार करण्यात आला असून केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी राज्य शासनामार्फत सादर करण्यात आला आहे. किल्ल्यांच्या ठिकाणी राज्य पुरातत्व विभागास जतन व संवर्धनाचे काम तसेच पर्यटकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम करण्यास परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे.येत्या काळात महावारसा योजना राबविण्यात येणार असून सामाजिक उत्तरदायित्व निधी, ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यामध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे मत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य भीमराव तापकीर ,सुभाष धोटे यांनी सहभाग घेतला.

000

राजू धोत्रे/विसंअ

 

शिवराम हरी राजगुरु यांच्या स्मारकाचा अंतिम आराखडा दोन महिन्यांत करणार

– सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोठे आहे. त्यांच्या स्मारकाबाबत शासन पुढाकार घेवून काम करीत आहे. या स्मारकाबाबत आराखडा तयार करण्यात आला होता. त्या आराखड्याच्या किंमतीत आता वाढ झाली आहे.या स्मारकाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींची समिती तयार करण्यात येईल. त्यात आमदारांच्या सूचनांचा अंतर्भाव करून दोन महिन्यांत अंतिम आराखडा तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य दिलीप मोहिते-पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) येथे शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, स्मारकासाठी यापूर्वीही निधी देण्यात आला होता. पर्यटन विभागानेही ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. राजगुरुनगर हे ऊर्जेचे, पराक्रमाचे, वीरतेचे केंद्र व्हावे, असे काम शासन करेल, असेही मंत्री  श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अजित पवार, सदस्य अतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला.

000

शैलजा पाटील/विसंअ

कर्करोग उपचार रुग्णालय उभारणीसाठी नगर विकास विभागासोबत

संयुक्त बैठक -सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई वडाळा येथील बीपीटीतील जागेवर कर्करोग उपचार रुग्णालय उभारणीच्या बाबतीत नगर विकास विभाग, महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य विभागाची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य कॅप्टन आर. तमील सेल्वन यांनी वडाळा येथील बीपीटीच्या जागेवर कर्करोग उपचार रुग्णालय उभारण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून सरकारी आणि खासगी क्षेत्रातील रुग्णालयामार्फत आरोग्य सेवा दिल्या जातात. महात्मा जोतिराव फुले योजनेअंतर्गत मागील तीन वर्षात एकूण 6.54 लाख कर्करोग रुग्णांना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळाला असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक साहाय्य म्हणून 793.96 कोटी इतका निधी देण्यात आला आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर मध्ये महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना अंतर्गत एकूण 28 रुग्णालयांमध्ये कर्करोग उपचाराच्या सुविधा उपलब्ध आहेत, अशी माहिती, मंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, राज्यात आठ परिमंडळ स्तरावर संबंधित जिल्ह्यात कर्क रोगाचे प्राथमिक टप्प्यात निदानाकरिता आठ कर्क रोग तपासणी वाहन खरेदी करण्यात येणार असून यामुळे गाव पातळीवर लवकर निदान करणे सोयीचे होईल. महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक एचपीव्ही लस सन 2023-24 पासून देण्यात येणार आहे. ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यातील 9 ते 14 वर्षे या वयोगटातील मुलींना ही लस देण्यात येणार आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री ॲड. आशिष शेलार, राजेश टोपे, योगेश सागर, अमित देशमुख, डॉ.जितेंद्र आव्हाड, सदस्या वर्षा गायकवाड, यामिनी जाधव यांनी सहभाग घेतला.

०००

शैलजा पाटील/विसंअ

 

 

‘प्रसाद’ योजनेंतर्गत वैजनाथ ज्योतिर्लिंगचा प्रस्ताव केंद्रास पाठविणार

– पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

केंद्र सरकारने तीर्थस्थळांच्या विकास व संवर्धनासाठी ‘प्रसाद’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्रालयास सादर करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य धनंजय मुंडे यांनी परळी येथील वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थळाचा सर्वांगीण विकास व संवर्धनासाठी केंद्रीय पर्यटन विभागाच्या ‘प्रसाद’ योजनेत समावेश केला जावा, अशी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पर्यटन संचालनालयामार्फत जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडून मागविण्यात आला आहे. त्यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ‘प्रसाद’ योजनेमधील तरतुदी निकषानुसार तपासून उचित कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सुभाष देशमुख यांनी सहभाग घेतला.

०००

शैलजा पाटील/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here