मुंबई दि. १४: मुंबई तसेच महाराष्ट्रात आगामी काळात अनेक मोठे विकास प्रकल्प सुरु होत आहेत, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी–जायका यांनी यासाठी अर्थसहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वर्षा येथे आज सकाळी जायकाचे अध्यक्ष डॉ. तनाका अखिको, मुख्य प्रतिनिधी साईतो मित्सुनोरी, आणि शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध विकास प्रकल्पांबाबत चर्चा केली. राज्य शासनाला जायकाचे सहकार्य राहील, अशी ग्वाही शिष्टमंडळाने दिली.
विशेषत: मुंबईतील भूमिगत मेट्रो, मुंबई-गोवा महामार्ग तसेच विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोर या व इतरही काही मोठ्या प्रकल्पांसाठी जायकाने अर्थसाहाय्य करण्यावर चर्चा झाली. अशा मोठ्या प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्याबाबत जायका आणि राज्य शासन यांच्यात समन्वय असावा, यासाठी एक समन्वय अधिकारी शासन नियुक्त करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले.
प्रारंभी या शिष्टमंडळाचे स्वागत करून मुख्यमंत्री म्हणाले की, जायकाच्या मदतीने मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक रोड तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात मोठमोठे विकास प्रकल्प मार्गी लागले असून मध्यंतरी डाव्होस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेतही महाराष्ट्राने १ लाख ३७ हजार कोटींची भरीव गुंतवणूक आणल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
जायकाच्या शिष्टमंडळात ताकूया ओत्सूका, मसनोरी सकामोटो, अनुराग सिन्हा आदींचा समावेश होता. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) राधेश्याम महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन, मंत्रालयातील वॉर रूमचे महासंचालक राधेशाम मोपलवार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजकुमार देवरा आदींची उपस्थिती होती.
०००