सर्वांगीण विकासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प

मराठी भाषेतील आद्यग्रंथ असलेल्या लीळाचरित्राची रचना ज्या भूमीत झाली त्या रिद्धपूरपासून ते राजमाता जिजाऊंचे माहेर असलेल्या सिंदखेडराजापर्यंत विस्तार असलेल्या वऱ्हाडभूमीचे महाराष्ट्रीय संस्कृतीचे अनन्यसाधारण स्थान आहे. गोदावरी आणि तापी नदीच्या उपनद्या या प्रदेशातून वाहतात. कापूस, सोयाबीन, तूर अशा पीकांबरोबरच संत्रा, सीताफळासारख्या फळपीकांचे हबही या भूमीत विकसित झाले आहेत.

या विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांची वैशिष्ट्ये, आवश्यकता लक्षात घेऊन राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने अर्थसंकल्पाद्वारे अनेक योजना व उपक्रमांना चालना देऊन सर्वसमावेशक व सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली आहे.

 मराठी भाषेचे गौरवस्थळ मानल्या जाणाऱ्या रिद्धपूर (जि. अमरावती) येथे मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय अर्थसंकल्पाद्वारे झाला आहे. अमरावती येथील शासकीय ज्ञान विज्ञान संस्था, तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकाचवेळी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ आणि दोन मोठ्या संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळणे ही घटना अमरावतीच्या शिक्षणपरंपरेला दृढ करणारी आहे.

विदर्भाचा कॅलिफोर्निया मानल्या जाणाऱ्या मोर्शी जिल्ह्यात, तसेच बुलडाणा जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया केंद्रे निर्माण करण्यात येणार आहेत. या परिसरातील संत्रा उत्पादन मोठे आहे. प्रक्रिया केंद्रे निर्माण झाल्याने येथील फळ उत्पादक शेतक-यांना त्याचा लाभ होईल. विदर्भ, मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतक-यांना अन्नधान्याऐवजी प्रतिवर्ष 1800 रूपये रोख देण्यात येणार आहे. हा निर्णय गरीब शेतकरी बांधवांना दिलासा देणारा आहे.

वैनगंगा-नळगंगा- पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर विभागातील नागपूर व वर्धा जिल्ह्यासह वऱ्हाडातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांना पाणी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. वऱ्हाडातील मोठ्या भूभागाला या प्रकल्पाद्वारे पाणी मिळून त्या परिसरातील शेती सुजलाम सुफलाम होणार आहे.

पायाभूत सुविधांमध्ये अमरावती विभागाला भरभरून मिळाले आहे. अकोला व अमरावती येथील विमानतळाचा विस्तार करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. उद्योगवाढीसाठी हा निर्णय महत्वाचा आहे. समृद्धी महामार्गाच्या विस्तार योजनेत सिंदखेडराजा नाेड ते शेगावपर्यंत चौपदरी महामार्ग बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड हे दत्तस्थान या मार्गावर येणार आहे. या निर्णयांमुळे परिसरात विकासाला चालना मिळेल.

अमरावती व बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून, ती आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी उपयुक्त ठरेल. वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शासनाकडून संत सेवालाल महाराज जोडरस्ते योजना राबविण्यात येणार असून, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील बंजारा तांड्यांना त्याचा फायदा होईल.

वऱ्हाड ही संतांची आणि महापुरूषांची भूमी आहे.वऱ्हाडभूमीतील थोर संत गाडगेबाबा यांचे अमरावती येथील समाधीस्थळ, तसेच त्यांची कर्मभूमी असलेल्या ऋणमोचन तीर्थक्षेत्राच्या विकास करण्यासाठी अर्थसंकल्पात 25 कोटी रू. चा निधी जाहीर करण्यात आला आहे. अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज दृकश्राव्य माध्यम उद्यान निर्माण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जीवनगाथा या माध्यमातून प्रदर्शित होणार आहे. दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

प्रत्येक प्रदेशाचा, प्रत्येक घटकाचा विचार करून सर्वांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाद्वारे करण्यात आला आहे. वऱ्हाडाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही देणारा हा अर्थसंकल्प आहे.

 

– हर्षवर्धन पवार,

प्र. उपसंचालक, अमरावती विभाग