मुंबई, दि. १५ : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतकाळ सुरू झाला आहे. या पर्वात वाराणशीच्या धर्तीवर नाशिक येथे भव्यदिव्य स्वरूपात रामतीर्थावर गोदा आरती सुरू करण्याचा निर्णय राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.
आज मंत्रालयात यासंदर्भात श्री. मुनगंटीवार यांनी आढावा बैठक घेतली. या उपक्रमसाठी विशेष समिती गठीत करुन याबाबत विस्तृत आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.या बैठकीला आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमाताई हिरे, आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी डी. गंगाधारन यांच्यासह नाशिक महापालिकेचे उपायुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, विविध विभागांचे अधिकारी, पुरोहित संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. मुनगंटीवार म्हणाले, हा उपक्रम अतिशय भक्तीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पूर्ण करावयाचा आहे. त्यामुळे यामध्ये लोकसहभाग वाढवून सर्वसामान्य जनतेकडून सूचना मागविण्यात याव्यात. आरती ज्या ठिकाणी प्रारंभ करायची आहे तो परिसर तसेच नदी स्वच्छ करण्यासाठी कार्यवाही सुरू करावी. स्वच्छता केंद्र, आकर्षक रोषणाई, पुरेशी वाहन पार्किंग व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, भाविकांना उभे राहण्याची किंवा बसण्याची प्रशस्त सोय तसेच स्थानिक छोटे व्यावसायिक व रहिवाशी यांना विश्वासात घेऊन शिस्तबद्ध रित्या नियोजन करण्यात यावे.
या बैठकीत उपस्थित आमदार तसेच पुरोहित संघाच्या वतीने महत्वपूर्ण सूचना मांडण्यात आल्या त्याची दखल श्री.मुनगंटीवार यांनी घेतली.